अमेरिकेतील एका गावात आताच ख्रिसमसची तयारी; संवेदनशील मनाला हेलावून टाकणारी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:35 AM2018-09-19T00:35:49+5:302018-09-19T06:58:56+5:30
सोहळा २३ सप्टेंबरला; दोन वर्षांच्या मुलाच्या आनंदासाठी सारे काही
ओहियो : गेल्या महिन्यात ब्रॉडी अॅलनच्या पालकांना डॉक्टरांनी सांगितले की, ‘तुमच्या मुलाला अतिशय दुर्मिळ असा मेंदूचा कर्करोग आहे. तो फार तर दोन महिनेच जगू शकेल. ब्रॉडी अॅलनचे वय आहे केवळ दोन वर्षे. त्यामुळे तो जिवंत असेपर्यंत त्याला आनंदात ठेवण्याचा निर्णय पालकांनी घेतला. किमान नाताळ म्हणजे ख्रिसमस तरी त्याने पाहावा, अशी पालकांची इच्छा आहे. त्यामुळे आतापासूनच ख्रिसमस साजरा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
ब्रॉडीच्या पालकांनी डिसेंबरपर्यंत न थांबता आताच ख्रिसमस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तसे त्यांनी शेजाऱ्यांनाही सांगितले आणि फेसबुकवरही तशी पोस्ट टाकली. त्याला कितपत प्रतिसाद मिळेल, हे माहीत नव्हते; पण संपूर्ण सिनसिनाटी शहरात आणि आसपासच्या उपनगरांत ही बातमी पसरली आणि मग प्रत्येक घरातही आताच नाताळ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापासूनच सर्व घरांत नाताळसारखे वातावरण आहे, तशी सजावट करण्यात आली आहे. सांता क्लॉजही गावात फिरू लागले आहेत. लहान मुलांना आणि विशेषत: ब्रॉडीला अनेक गिफ्टस् देऊ लागले आहेत. त्यामुळे ब्रॉडी सध्या तरी आनंदात आहे.
शुभेच्छा अन् मिठाई
प्रत्यक्ष तिथे ख्रिसमस साजरा केला जाणार आहे २३ सप्टेंबर रोजी; पण सिनसिनाटीच्या त्या गावातील रस्त्यांवरून फिरताना त्या मुलाच्या आनंदासाठी सजावट केल्याचे दिसत आहे. प्रत्येक जण एकमेकांना, विशेषत: ब्रॉडीच्या घरी येऊ न त्याला शुभेच्छा आणि मिठाई देत आहे. ख्रिसमस परेड २३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी निघणार आहे.