सार्वमताआधीच ग्रीक जनतेत फूट
By admin | Published: July 5, 2015 04:14 AM2015-07-05T04:14:28+5:302015-07-05T04:14:28+5:30
युरोपीय संघ, तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या ग्रीसला देऊ केलेला सशर्त आर्थिक मदतीचा प्रस्ताव मान्य करावा की नाही, यावर ग्रीसमध्ये
अथेन्स : युरोपीय संघ, तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या ग्रीसला देऊ केलेला सशर्त आर्थिक मदतीचा प्रस्ताव मान्य करावा की नाही, यावर ग्रीसमध्ये घेण्यात येणाऱ्या सार्वमताच्या आदल्या दिवशीच ग्रीक जनतेत फूट पडली आहे.
मध्य अथेन्सस्थित सिन्टाग्मा चौकात आयोजित रॅलीत ग्रीसचे पंतप्रधान अॅलेक्सिस सिप्रास यांनी युरोपीय संघाच्या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले असताना त्याच ठिकाणापासून काही अंतरावर जमलेल्या २० हजार लोकांनी मात्र प्रस्तावाच्या बाजूने घोषणाबाजी केली.
युरोपीय संघाच्या धमक्यांना भीक न घालता ग्रीक जनतेने भीती दाखविण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांना मतदानातून विरोध करावा, असे आवाहन पंतप्रधान अॅलेक्सिस सिप्रास यांनी या रॅलीत केले. या सार्वमतातून आपण युरोपात सन्मानाने राहण्याचा फैसला करीत आहोत, असे ते म्हणाले. जानेवारीत पार पडलेल्या निवडणुकीत निवडून आलेले सिप्रास यांनी आर्थिक काटकसरीचे पर्व संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले होते.
दुसरीकडे न्यू नाजी गोल्डन पार्टी, न्यू डेमोक्रॅसी (सेंटर-राईट), पासोक (सेंटर-राईट) आणि तो पोतामी या विरोधी पक्षांनी या प्रस्तावाच्या बाजूने मोहीम उघडली आहे.
आर्थिक संकटाच्या विळख्यातून ग्रीसला बाहेर काढण्यासाठी गेले पाच महिने कर्जदात्यांशी वाटाघाटी करण्यात आल्या. त्यानंतर सिप्रास यांनी २७ जून रोजी या सशर्त प्रस्तावावर सार्वमत घेण्याची घोषणा करून युरोपीय संघातील देशांना धक्का दिला होता.
आर्थिक मदतीची मुदत ३० जूनला संपली असून मुदतवाढ देण्यास कर्जदात्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे ग्रीसने आठवडाभर बँका बंद ठेवण्याचा आणि दररोज ६० युरो बँकेतून काढण्याचे निर्बंध जारी केले. परिणामी मोठ्या संख्येने ग्रीक जनता युरोपीय संघाच्या बाजूने एकवटली आहे. (वृत्तसंस्था)