अजी म्या ‘ॲट्टाे’सेकंदात इलेक्ट्रॉन्स पाहिले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 05:18 AM2023-10-04T05:18:07+5:302023-10-04T05:18:46+5:30
पियरे ऑगस्टिनी, फेरेन्स क्रॉस, ॲन हुलियर यांना भौतिकशास्त्राचा नोबेल
स्टॉकहोम : सेकंदापेक्षाही वेळेचे छोटे एकक म्हणजे ॲट्टाेसेकंद. अशा या कालावधीत अणूंमधील इलेक्ट्रॉन्स पाहण्यात यश मिळवणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मंगळवारी जाहीर करण्यात आले. पियरे ऑगस्टिनी, फेरेन्स क्रॉस, ॲन हुलियर अशी या शास्त्रज्ञांची नावे आहेत.
भौतिकशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मिळविलेल्या ॲन हुलियर या पाचव्या महिला शास्त्रज्ञ आहेत. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या प्रयोगांनी मानवतेला अणू आणि रेणूंमधील इलेक्ट्रॉनच्या जगाचा शोध घेण्यासाठी नवीन हत्यार दिले आहे.
काय आहे इतिहास?
अणू हा रासायनिकदृष्ट्या मूलद्रव्याचा लहानात लहान घटक आहे. मात्र, विसाव्या शतकात या अणूचीही विभागणी त्याच्या घटक कणांत (मूलकणांत) करता येते, हा सिद्धांत मान्यता पावला. इलेक्ट्रॉन ही संज्ञा सर्वप्रथम जी. स्टोनी यांनी १८९१ ला विद्युतभाराच्या एककास उद्देशून वापरली. अशा एककाची कल्पना फॅराडे यांनी विद्युत विश्लेषणासंबंधी केलेल्या कार्यावरून निघाली होती.
नोबेलसारखा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याने मी खूप आनंदित झाले आहे. याआधीही काही महिला शास्त्रज्ञांचा नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. त्यांच्या पंक्तीत आता माझा समावेश झाला आहे.
- ॲन हुलियर
या संशोधनाचे महत्त्व काय?
शास्त्रज्ञांनी सिद्ध केले की, प्रकाशाच्या पराकोटीच्या सूक्ष्म पण शक्तिशाली अशा शलाका निर्माण करून त्यांच्या
मदतीने विलक्षण वेगवान प्रक्रियेद्वारे होणारी इलेक्ट्रॉन्सची हालचाल किंवा त्यांच्यातील ऊर्जेत होणारा बदल मोजता
येईल. भविष्यकाळात या संशोधनाचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्समधील प्रगतीसाठी तसेच चांगल्या रोगनिदानासाठी होईल, अशी आशा आहे.