फक्त मोसादच्या इशाऱ्याची वाट पाहतोय, इस्रायलच्या मनात काही वेगळेच सुरू...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 02:16 PM2024-08-05T14:16:36+5:302024-08-05T14:16:53+5:30
इस्रायलप्रमाणेच अमेरिकेलाही इराणचा हल्ला कसा थोपविता येईल याबाबत साशंकता आहे. इराणने अद्याप आपल्या कारवाईबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही, असे मानले जात आहे.
इस्त्रायलवर इराण कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता आहे. अमेरिका सांगतेय की आज हल्ला होईल, इराणने हल्ला करू नये म्हणून अमेरिकेने अनेक युद्धनौका, विमानवाहू युद्धनौका जवळच्या समुद्रात पाठविल्या आहेत. अशातच सर्वांना पुरून उरलेला इस्रायल त्यांची सर्वात शक्तीशाली गुप्तहेर संघटना मोसादच्या एका इशाऱ्याची वाट पाहत असल्याचे समोर येत आहे.
इराणने जर इस्रायलवर हल्ल्याचे पक्के केले आहे, यामुळे हल्ला होणार हे नक्की आहे. असा इशारा जर मोसादने दिला तर इराण आपल्यावर हल्ला करेल याची वाट न पाहता इस्रायलच तेहरानवर हल्ला चढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी सायंकाळी देशाच्या संरक्षण दलाच्या प्रमुखांसोबत बैठक केली. या बैठकीनंतर हिब्रू मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार जर इराण आपल्यावर हल्ला करण्याचे ठोस पुरावे मिळाले तर इस्रायल इराणला रोखण्यासाठी पहिला हल्ला करण्याची शक्यता आहे.
टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार हिजबुल्लाह आणि इराण इस्रायलवर हल्ला करू शकतात. इस्रायल संभाव्य हल्ल्याला कसे चोख प्रत्युत्तर देऊ शकेल किंवा तो रोखू शकेल यावर विचार करत आहे. इराणकडून हल्ला होण्याची शक्यता असेल तर इस्रायलच पहिला हल्ला करू शकते. तेहरान हल्ला करणार असल्याची पुष्टी करणारी निश्चित गुप्त माहिती इस्रायलला मिळाली तरच असे पाऊल उचलले जाईल. यासाठी मोसादने आणलेली माहिती आणि अमेरिकेच्या गुप्तहेरांनी दिलेली माहिती जुळते का हे पाहिले जाणार आहे.
इस्रायलप्रमाणेच अमेरिकेलाही इराणचा हल्ला कसा थोपविता येईल याबाबत साशंकता आहे. इराणने अद्याप आपल्या कारवाईबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही, असे मानले जात आहे. परंतू, इराणला थोपवायचे असेल तर आधीच आपण त्यांच्या ठिकाण्यांवर हल्ले चढवावे आणि त्यांची शस्त्र सामुग्री नष्ट करावी असा विचार केला जात आहे. हे असे हल्ले करून एकाचवेळी अनेक शत्रूंना बेजार करण्याची इस्रायलचा इतिहास आहे.