जस्टीन बिबर आला आणि गेला पण धुरळा उडालाच नाही

By admin | Published: May 12, 2017 12:15 PM2017-05-12T12:15:17+5:302017-05-12T13:07:04+5:30

एखादा आतंरराष्ट्रीय गायक इथे आणायला 30 कोटी पेक्षा अधिक गुंतवणूक करावी लागते. आणि मग भारतासारख्या देशात हा जस्टीन किती लोकांवर इनजस्टीस करतो हा विचार मनोरंजनापलीकडे जाऊन केला पाहीजे.

Justin Bieber came and went but did not miss the dust | जस्टीन बिबर आला आणि गेला पण धुरळा उडालाच नाही

जस्टीन बिबर आला आणि गेला पण धुरळा उडालाच नाही

Next

 - केशव उपाध्ये 

‘बेबी बेबी’ हे गाणं ऐकलं तेव्हाच मनाचं वेध घेणारं वाटलं. गाणारं पोरगं पण चुणचुणीत वाटलं. खरतर कमी वयात प्रसिद्धी मिळवणारे आजकाल खूप आहेत. आपल्याकडे तर उठसुठ लाईव्ह शोमधून असे कमी वयाचे चेहरे समोर येत असतात. काही दिवस रेंगाळतात आणि मग उन्हामुळे सावली लांब व्हावी अन एकदम ती नाहीशी होऊन जावी अगदी त्याप्रमाणे या चेहऱ्यांचे होते. ‘I know you love me’ असा म्हणणारा हा मुलगा किती काळ टिकेल ही शंका मनात ठेऊन ते गाण काहीवेळा ऐकलं आणि सोडूनही दिलं... पण हाच मुलगा माझ्या देशात कार्यक्रमासाठी आल्यानंतर ७५ हजाराची तिकीट घेईल हा कल्पनाविलास तेव्हा रंगवणे म्हणजे कल्पनेचे तीर मारले असे झाले असते. त्याचा शो भारतात होणार आणि तेही आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ही बातमी शोच्या आर्थिक गणितांनीच जास्त प्रसिद्धीच्या झोतात आली.
 
2013 मध्ये ज्याच्या अल्बमच्या 65 मिलीयन प्रती विकल्या गेल्या, असा हा जगात लोकप्रिय असलेला हा जस्टीन बिबर स्वाभाविकपणे मुंबईतही गर्दी खेचणार, तरूणाई त्याच्या शोवर उड्या मारणार हे सांगायला कुणा भविष्यवेत्याची गरज नव्हती. ज्या डी. वाय. पाटील मैदानावर हा कार्यक्रम झाला तिकडे जाणारे सगळे रस्ते गर्दीने भरले होते. वाहतूक कोलमडली होती. तिकिटांची धावाधाव सुरू होती. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तरूणींची संख्या पाहून तर इतकं प्रेम सलमान-शाहरूखला तरी मिळालं का? असा प्रश्न एकाने विचारला होता. एखाद्या गायकासाठी इतका मोठा चाहतावर्ग?
 
जगातला सुरू असलेला ट्रेन्ड पकडा आणि त्यावर आपलं संगीत बनवा, हे संगीत लोकांना नक्की लोकांना आवडेल असं सांगणारा हा पोरगा, पॉपला लोक डर्टी समजतात पण पॉप म्हणजे लोकांना आवडणारं असं सांगणारा हा पॉपचा सध्याचा किंग... जे जॅक्सनने साध्य केलं होतं त्याच्याशीच स्वतःला तोलू पाहणारा.. असा जस्टीन बिबर. 
 
यावेळी मला आठवण झाली ती 1996 सालातील मायकल जॅक्सनच्या दौऱ्याची. मी त्यावेळी पत्रकारितेत होतो. आजच्या सारखी समाजमाध्यमही त्यावेळी नव्हती. ना संगीताचे वेगवेगळे डीव्हाईसेस उपलब्ध होते. त्यामुळे संगीत शौकीनांचे फार लाड नसायचे. मर्यादित साधनांवर संगीताची आवड भागवावी लागे. प्रवासात तर वॉकमन असायचा. वॉकमन आणि त्याचा कॅसेट असलेली लेदर पाऊच कमरेला बांधायची त्यावेळा फॅशन असायची. 
 
त्यावेळी मायकल जॅक्सनच गारूडच वेगळं होतं. 1880-90 च्या दशकात त्याने धुमाकुळ घातला. त्याचे थ्रीलर, बँड सारख्या अल्बमच्या 41 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या होत्या. ते युग इंटरनेटचं नव्हतं पण ग्लोबल ही टर्म इंटरनेटआधी जॅक्सनने आणली म्हणाल तर चुकीच ठरणार नाही. संगीत ऐकण्याची मर्यादित साधन असूनही त्याची भारतातील प्रचंड लोकप्रियतेच साक्ष ही त्यावेळी त्याचा कार्यक्रम झालेला अंधेरी स्पोर्ट्स कॉप्लेक्स देत होतं.
 
जस्टीन बिबर आला आणि गेला पण फार धुरळा उठला नाही. हा जॅक्सन आणि बिबरच्या तुलनेचा मुद्दा नाही. दोघेही आपल्या जागी मोठे आहेत लोकप्रिय आहेत. पण जॅक्सनच्या येण्याने इथलं समाजमन ढवळून निघालं होतं त्यामानाने काल बिबर आला आणि गेलाही. 
 
मुळातच जॅक्सनच व्यक्तीमत्वच वादग्रस्त, त्यातून भारतासारख्या देशात येत होता. त्यामुळे इथल्या लोकांमध्ये अधिकच अस्वस्थता होती. अस्वस्थता वाढायला अजून एक कारण होतं ते म्हणजे भारतानं खुली अर्थव्यवस्था नुकतीच स्वीकारली होती. त्यामुळे आपल्या संस्कृतीवर वेगवेगळ्या पद्धतीने परकीय आक्रमण होणार ही भावना केवळ कट्टर संस्कृतीप्रेमीपुरती मर्यादित नव्हती तर सर्वसाधारण लोकांनाही वाटत होती.
 
त्यामुळे आता जॅक्सन येणार म्हणजे प्रचंड काहीतरी पातक होणार अशा पद्धतीनं लोक व्यक्त होत होते तर दुसरीकडे तरूणांमध्ये मात्र त्याच्या येण्यानं प्रचंड उत्साह संचारला होता. साहजिकच वातावरण तापले होते. दोन्ही बाजूनी चर्चांची फेऱ्या झडत होत्या. त्याच्या कार्यक्रमाच्या विरोधात आंदोलनाचे इशारे दिले जात होते. तर तिकिटासाठी तरूणाईची झुंबडपण उडाली होती. जॅक्सनच्या कार्यक्रमाच्या घोषणेपासून उठलेलं वादळ तो येऊन गेल्या नंतरही काही दिवस सुरू होतं. अगदी सोनाली बेंद्रेने त्यावेळी केलेल्या त्याच्या नऊवारी साडीतल्या स्वागताचीही चर्चा नंतर कितीतरी दिवस होत होती. 
 
त्या अर्थाने बिबरबाबत असा वाद उफाळला नाही ना वादंग झालं. आज रेडिओ, सिनेमा नाटक यासारखी मनोरंजनाची साधने उपलब्ध असतानाही लोक लाईव्ह शो निवडू लागलेत हा बदलत्या अभिरूचीचा परिणाम मान्य करावा लागेल. अर्थात त्याची काही कारणही आहेत. नवीन-नवीन संगीताची वाद्य, भव्य जागांची उपलब्धता, तिथे सहज उपलब्ध करता येणाऱ्या सोयी... हा एक नवा मनोरंजनाचा पर्याय चांगला वाटतो. 
 
आज असे कार्यक्रम भारतीय गायकांचे पण होतात. पण एखादा आतंरराष्ट्रीय गायक इथे आणायला 30 कोटी पेक्षा अधिक गुंतवणूक करावी लागते. आणि मग भारतासारख्या देशात हा जस्टीन किती लोकांवर इनजस्टीस करतो हा विचार मनोरंजनापलीकडे जाऊन केला पाहीजे. 
 
ही त्या-त्या देशातील पॉपमधील किंग मंडळी लोकांना त्यांच्या तालावर थिरकायला लावतील. पार चेन्नई आणि दिल्लीपासून लोकांना मुंबईत खेचून आणतील पण त्यांच्या संगीतातून मिळणारा आनंद हा आमच्या किशोरीताईंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कदापी भरून काढू शकत नाहीत हे सत्य आणि श्वाश्वत आहेत.
 
केशव उपाध्ये
Twitter ID -  @keshavupadhye
(लेखक भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत)
 
 

Web Title: Justin Bieber came and went but did not miss the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.