Nepal : के.पी.शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी; विरोधकांनाही बहुमत सिद्ध करण्यात अपयश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 03:07 PM2021-05-14T15:07:57+5:302021-05-14T15:10:20+5:30
के.पी.शर्मा ओली यांच्याकडे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची धुरा. काही दिवसांपूर्वी त्यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्यात आलं होतं अपयश.
कोरोना विषाणूच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भावाचा सामना करत असलेल्या नेपाळमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरूच आहेत. नेपाळमध्ये गुरूवारी विरोधी पक्षाला नवं सरकार स्थापन करण्यास आवश्यक असलेलं बहुमत सिद्ध करण्यास अपयश आलं. यानंतर नेपाळच्या संसदेनं मोठा राजकीय पक्षाच्या नेत्याच्या रुपात के.पी.शर्मा ओली यांच्याकडे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची धुरा सोपवली. नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष ओली यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं.
तीन दिवसांपूर्वी ओली यांना संसदेच्या प्रतिनिधी सभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं होतं. त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु यानंतर विरोधकांनाही बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे नेपाळच्या संविधानातील कलमानुसार प्रतिनिधी सभेत सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या रूपात ओली यांची पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी ओली यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
Nepal's Opposition fails to garner a majority, KP Sharma Oli re-appointed as the Prime Minister
— ANI (@ANI) May 13, 2021
(File photo) pic.twitter.com/3hPbD6thAa
यापूर्वी विरोधकांना बहुमत सिद्ध करण्यास अपयश आल्यानं ओली यांची पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. राष्ट्राध्यक्षा विद्या देवी भंडारी यांनी विरोधकांना गुरूवारी रात्री ९ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची वेळ दिली होती. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देऊबा यांना सीपीएन माओवादचे अध्यक्ष पुष्पकमल दल 'प्रचंड' यांचं समर्थन मिळालं होतं. परंतु त्यांना जनता समादवादी पार्टीचं समर्थन मिळालं नाही. जेएसपीचे अध्यक्ष उपेन्द्र यागव यांनी देऊबा यांना समर्थन देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु पक्षाचे दुसरे अध्यक्ष महंत ठाकुर यांनी या प्रस्ताव फेटाळला.