संपूर्ण काबुल विमानतळाला उडवायचा होता मनसुबा; तब्बल ११ किलो स्फोटकं बांधून गर्दीत शिरला होता हल्लेखोर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 11:09 AM2021-08-28T11:09:31+5:302021-08-28T11:09:57+5:30
हल्लात आतापर्यंत १६९ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. यात १३ अमेरिकन सैनिकांचा देखील समावेश आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबुल मधील हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गुरुवारी संध्याकाळी झालेल्या आत्मघाती स्फोटात हल्लेखोरानं स्वत:च्या शरीरावर जवळपास ११ किलो स्फोटकं बांधली होती अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय त्याच्याजवळ अनेक काडतुसं देखील होती. एका अमेरिकी अधिकऱ्यानं याबाबतची माहिती दिली आहे. या हल्लात आतापर्यंत १६९ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. यात १३ अमेरिकन सैनिकांचा देखील समावेश आहे. इस्लामिस स्टेटनं (आयसिस) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
नाव उघड न करण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्यानं या हल्ल्याबाबतची महत्वाची माहिती उघड केली आहे. अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार घातक विस्फोटकांचा वापर करुन हा स्फोट घडवून आणलेला होता. त्यामुळे विमानतळाच्या गेटच्या आत तैनात असलेल्या अमेरिकी सैनिकांसोबतच अफगाणि नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. सामान्यत: हल्लेखोर आजवर ५ ते १० पाऊंड विस्फोटकं घेऊन आत्मघाती हल्ला केल्याच्या घटना आजवर घडल्या आहेत. पण यावेळी २५ पाऊंड म्हणजेच जवळपास ११ किलो स्फोटकं घेऊन दहशतवाद्यानं आत्मघाती हल्ला केला आहे. हल्लेखोर काबुल विमानतळाच्या गेटच्या गजांमधून आत शिरला होता. याठिकाणी अफगाणिस्तानातून बाहेर जाण्यासाठी हजारो नागरिक अफगाण नागरिक जमा झाले होते.
काबुलमध्ये आणखी एका हल्ल्याची शक्यता
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी राष्ट्रीय सुरक्षा दलाला काबुलमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. या परिस्थितीत काबुल विमानतळावर सुरक्षेच्या सर्वोच्च उपाययोजना आखण्याचे आदेश बायडन यांनी दिले आहेत. याशिवाय पुढील काही दिवस अफगाणिस्तानातील अमेरिकन नागरिकांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेसाठी खूप जोखमीचे असतील असंही व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे.