कहीं पे निगाहे कहीं पे निशाना; चीनचा अमेरिकेला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 02:11 AM2020-06-27T02:11:32+5:302020-06-27T07:19:31+5:30
अमेरिकेला आक्रमक संदेश पोहोचावा यासाठी चीनकडून या कारवाया सुरू आहेत, असे आंतरराष्ट्रीय राजकारण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
न्यूयॉर्क : अलीकडील काही आठवड्यांत चीनचे भारतासह जपान आणि तैवान या सर्वच शेजाऱ्यांसोबत वाद सुरू आहेत. चीन आपल्या शेजाºयांसोबतचे वाद उकरून काढत असला तरी त्याचा निशाणा अमेरिकेवर आहे. अमेरिकेला आक्रमक संदेश पोहोचावा यासाठी चीनकडून या कारवाया सुरू आहेत, असे आंतरराष्ट्रीय राजकारण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
चीनने भारतासोबतच्या सीमेवर नुकताच रक्तरंजित संघर्ष घडवून आणला आहे. चीनची एक पाणबुडी जपानजवळील समुद्रात जाऊन येऊन गेली आहे. चीनची फायटर जेट विमाने आणि किमान एक बॉम्बफेकी विमान तैवानच्या हद्दीत रोज घुसखोरी करताना दिसून येत आहेत. जग कोरोना विषाणूच्या लढाईत गुंतलेले असताना चीनने शेजारी देशांच्या हद्दींत कित्येक आघाड्यांवर घुसखोरी केली आहे. संपूर्ण वसंत ऋतूच्या काळात चीनच्या या कारवाया सुरू होत्या.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, चीनच्या आक्रमकतेतून या देशाचा वाढता आत्मविश्वास आणि लष्करी क्षमता यांचे प्रतिबिंब उमटते; पण त्याचबरोबर अमेरिकेसोबतच्या संघर्षाची किनारही त्याला आहे. कोरोनाच्या साथीवरून अमेरिका आणि चीन यांच्यात संघर्ष सुरू आहे. हाँगकाँगच्या भवितव्याचाही मुद्दा आहेच. त्यासाठी चीन अमेरिकेला इशारा देऊ इच्छित आहे.
भारत-चीन सीमेवर १९६७ नंतर प्रथमच रक्तरंजित संघर्ष झडला आहे. यात भारताप्रमाणेच चीनचे सैनिकही मृत्युमुखी पडले आहेत. १९७९ साली व्हिएतनामसोबत झालेल्या युद्धानंतर पहिल्यांदाच चिनी सैनिक सीमेवरील संघर्षात ठार झाले आहेत. यावरून या संघर्षाची तीव्रता स्पष्ट होते. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ साऊथ चायना सी स्टडीज’ या संस्थेचे अध्यक्ष वू शिचून यांनी बीजिंगमधील एका परिषदेत अमेरिकेच्या या भागातील लष्करी हालचालींविषयीचा अहवाल सादर केला. त्यावेळी त्यांनी म्हटले की, ‘अपघाताने होणाºया गोळीबाराच्या घटनांत वाढ झाली असण्याची शक्यता मला दिसून येत आहे.’
चीनकडून आपल्या सीमांचे नेहमीच आक्रमकतेने संरक्षण करण्यात येते. तथापि, सध्याची चीनची युद्ध क्षमता प्रचंड आहे. आॅस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील संशोधन संस्था ‘चायना पॉलिसी सेंटर’चे संचालक अॅडम नि यांनी सांगितले की, चीनची युद्ध क्षमता इतर विभागीय महासत्तांच्या तुलनेत प्रचंड वेगाने वाढत आहे. आपला आक्रमक अजेंडा राबविण्यासाठी चीनला अधिक साधनसामग्री त्यातून मिळाली आहे.
याशिवाय चीनने दक्षिण चीन समुद्रातील आपली दावेदारी वाढविली आहे. येथील बेटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन नवीन प्रशासकीय जिल्हे तयार केले आहेत. एप्रिलमध्ये चीनच्या तटरक्षक दलाने व्हिएतनामची एक मच्छीमार नौका बुडविली. मलेशियाचे एक संशोधक जहाज रोखले.
चीनच्या या हालचालींमुळे अमेरिका आणि आॅस्ट्रेलिया यांनी या भागात चार युद्ध नौका पाठविल्या. त्यावर चीनने आणखी आक्रमक होत पूर्व चीन समुद्रात पाणबुडीची गस्त सुरू केली. गेल्याच आठवड्यात एक चिनी पाणबुडी येथे आढळून आली.
‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’मधील संरक्षण विभागाचे संचालक एम. टेलर फ्रावेल यांनी सांगितले की, आपले नौदल मजबूत केल्यामुळे पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रावरील आपली दावेदारी वाढविणे चीनला शक्य झाले आहे. येथील आकाशातील गस्तही चीनने वाढविली आहे. या क्षेत्रात चीनची एच-६ बॉम्बर विमानांची उड्डाणे आता नित्याची झाली आहेत. सूत्रांनी सांगितले की, पूर्व व दक्षिण चीन समुद्रात चीनच्या विस्तारवादाला अमेरिकेकडूनच विरोध होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेला आपल्या आक्रमक धोरणांची चुणूक चीन दाखवून देऊ इच्छितो. भारतासोबत जो सीमावाद नुकताच झडला आहे, त्यामागे चीनचा हाच उद्देश आहे.
चीनने १९९० पासून आपली युद्ध साहित्याची सिद्धता वाढवायला सुरुवात केली. विद्यमान चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात या सिद्धतेला आणखी गती देण्यात आली. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी गेल्याच महिन्यात चीनची लष्करी तरतूद ६.६ टक्क्यांनी वाढवून १८० अब्ज डॉलर करण्याची घोषणा केली. इतर सर्व खर्च कोरोना साथीमुळे कमी होत असताना लष्करी खर्च चीनने वाढविला आहे.
चिनी लष्कर अमेरिकी लष्कराच्या तुलनेत खूप पिछाडीवर असल्याचे मानले जात आले आहे. तथापि, आता परिस्थिती खूपच बदलली आहे. विशेषत: चीनची सागरी युद्धक्षमता खूपच वाढली आहे. हवाई क्षेपणास्त्र क्षेत्रातही चीनने मोठा पल्ला गाठला आहे. चीनकडे आज ३३५ युद्धनौका असल्याचे मानले जाते. अमेरिकेकडे मात्र फक्त २८५ युद्धनौका आहेत, असे वॉशिंग्टनमधील ‘काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिस’च्या गेल्या महिन्यातील अहवालात म्हटले आहे. नौदल क्षमतेत चीनने आता अमेरिकेला मोठे आव्हान निर्माण केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
>तैवानचे बेट
घेण्यासाठी रंगीत तालीम
चीनने अलीकडे तैवानजवळील लष्करी हालचाली वाढविल्या आहेत. तैवानच्या पूर्व किनारपट्टीजवळ चीनच्या दोन विमानवाहू नौका आणि पाच युद्धनौका एप्रिलमध्ये येऊन गेल्या. गेल्याच आठवड्यात तैवानच्या हवाई हद्दीत चिनी विमाने घिरट्या घालून गेली. येत्या आॅगस्टमध्ये चीन युद्ध सराव करणार असून, त्यात तैवानचे प्रतास बेट ताब्यात घेण्याची रंगीत तालीम केली जाणार असल्याचे समजते.