कमला हॅरिस ८५ मिनिटांसाठी बनल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष; सर्वोच्चपदावर काम करणाऱ्या ठरल्या पहिल्या महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 04:02 AM2021-11-21T04:02:28+5:302021-11-21T04:03:13+5:30
जॉर्ज डब्ल्यू बुश २००२ व २००७ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनाही अशाच प्रकारे आपले अधिकार तत्कालीन उपाध्यक्षांकडे सोपवावे लागले होते. प्रशासकीय व्यवस्थेचा भाग म्हणून राष्ट्राध्यक्षांना संपूर्ण आरोग्य तपासणी करावी लागते. त्या काळात गरज भासल्यास असा निर्णय घेतला जातो.
वॉशिग्टन : जगाची महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद शुक्रवारी ८५ मिनिटांसाठी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याकडे सोपवण्यात आले होते. काही मिनिटांसाठी का असेना, अमेरिकेच्या या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या कमला हॅरिस पहिल्या भारतीयच वंशाच्या नव्हे, तर पहिल्या आशियायी व्यक्ती ठरल्या.
अमेरिकेच्या अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्याही त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. झाले असे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांची त्या दिवशी दैनंदिन आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातील कोलोनोस्कोपी चाचणीसाठी त्यांना काही वेळ भूल दिली जाणार होती. त्यामुळे या काळात राष्ट्राध्यक्षपदाचे सर्व अधिकार बायडन यांनी कमला हॅरिस यांना दिले होते.
राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे माध्यम सचिव जेन साकी यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जो बायडन यांची ही पहिली संपूर्ण शरीराची चाचणी होती. या तपासणीच्या काळात १९ नोव्हेंबरला अमेरिकी वेळेनुसार सकाळी १० वाजून १० मिनिटांनी राष्ट्राध्यक्षपदाचे सर्व अधिकार कमला हॅरिस यांच्याकडे सोपवण्यात आले. हे अधिकार त्यांच्याकडे ११ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, ८५ मिनिटांसाठी होते.
आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर बायडन शुद्धीवर येताच पुन्हा हे अधिकार बायडन यांच्याकडे आले. चाचणीनंतर बायडन यांनी कमला हॅरिस आणि व्हॉईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ रोन क्लेन यांच्याशी चर्चा करून पुन्हा कार्यभार स्वीकारला.
आधी असे दोन वेळा घडले -
जॉर्ज डब्ल्यू बुश २००२ व २००७ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनाही अशाच प्रकारे आपले अधिकार तत्कालीन उपाध्यक्षांकडे सोपवावे लागले होते. प्रशासकीय व्यवस्थेचा भाग म्हणून राष्ट्राध्यक्षांना संपूर्ण आरोग्य तपासणी करावी लागते. त्या काळात गरज भासल्यास असा निर्णय घेतला जातो.