डिबेटमध्ये ट्रम्प यांना घेरण्यात कमला ठरल्या यशस्वी; अनेक मुद्द्यांवर झाली कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 06:26 AM2024-09-12T06:26:47+5:302024-09-12T06:28:22+5:30
व्यापार, गर्भपात, युक्रेन, गाझा युद्ध आणि अवैध घुसखोरीच्या मुद्द्यांवरून ट्रम्प यांना घेरले
वॉशिंग्टन - अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बुधवारी राष्ट्राध्यक्ष पदाची डिबेट पार पडली.
भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता झालेल्या या डिबेटमध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी एकमेकांना लक्ष्य केले. अर्थव्यवस्था, व्यापार, गर्भपात, युक्रेन, गाझा युद्ध व अवैध घुसखोरी या मुद्द्यांवरून कमला यांनी ट्रम्प यांना घेरले. चर्चेत हॅरिस या ट्रम्प यांच्यावर वरचढ ठरल्याचे दिसले. आले. फिलाडेल्फियामध्ये ही चर्चा ९० मिनिटे चालली. राष्ट्राध्यक्ष पदासाठीची पहिली डिबेट जून महिन्यात ट्रम्प व जो बायडेन यांच्यात पार पडली होती. या डिबेटमध्ये बायडेन यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर पक्षाचा दबाव वाढला.
कमला हॅरिस यांचे मुद्दे
■ ट्रम्प यांच्या प्रचार सभेतून लोक जातात. ■ ट्रम्प अध्यक्ष झाले तर युद्ध भडकेल. ■ ट्रम्प यांचे मित्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन युरोपवर कब्जा करतील. ■ ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास घटना पायदळी तुडवतील.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
■ हॅरिस यांच्या प्रचार सभेसाठी लोक वाहनांनी आणावे लागतात. ■ रशिया-युक्रेन युद्ध २४ तासांत बंद करेन. ■ हॅरिस यांच्या खोटारडेपणामुळे माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला. ■ घुसखोरांना बाहेर काढणार, अवैध घुसखोरी थांबवणार.
ट्रम्प यांची सावध भूमिका
एका अश्वेत आणि त्यातही महिलेला जर डिबेटमध्ये आडवे तिडवे बोलल्यास अमेरिकेतील बहुसंख्य अश्वेत आणि महिला मतदार आपल्या विरोधात जातील या भीतीपोटी ट्रम्प यांनी बोलताना मर्यादा सुटणार नाही, याची खबरदारी घेतल्याचे या चर्चेत दिसून आले.