कमला हॅरिस यांची अल्प लोकशाही प्रक्रियेने उमेदवार म्हणून निवड, ट्रम्प यांच्या प्रचार अभियान टीमचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 01:18 PM2024-08-04T13:18:25+5:302024-08-04T13:18:46+5:30
...हॅरिस यांच्या नावावर एकही मतदान झाले नाही. राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या निवडीसाठी राबवलेली प्रक्रिया साम्यवादी चीनची आठवण करून देणारी असल्याचा दावा करत ट्रम्प यांच्या टीमने हॅरिस यांच्यासाठी राबविलेल्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
वॉशिंग्टन डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या अल्प लोकशाही प्रक्रियेने निवडल्या गेलेल्या उमेदवार असल्याचा आरोप शुक्रवारी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार अभियान टीमने केला. हॅरिस यांच्या नावावर एकही मतदान झाले नाही. राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या निवडीसाठी राबवलेली प्रक्रिया साम्यवादी चीनची आठवण करून देणारी असल्याचा दावा करत ट्रम्प यांच्या टीमने हॅरिस यांच्यासाठी राबविलेल्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमदेवाराच्या निवडीसाठीची निवड प्रक्रिया शुक्रवारी संपन्न झाली. यात भारतीय वंशाच्या ६९ वर्षीय कमला हॅरिस यांना प्रतिनिधींची मते मिळाली. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून नावाची घोषणा करण्यात आली. ५ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा सामना रिपब्लिक पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (७८) यांच्याशी होणार आहे.
देशाच्या लोकशाहीलाच धोका
डेमोक्रॅटिक पक्षाच्या लोकांमुळे देशाच्या लोकशाहीलाच खरा धोका असल्याचा आरोप ट्रम्प यांच्या टीमने केला आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत कमी लोकप्रिय उमेदवार कमला हॅरिस असून, स्वतःच्या नावावर त्यांना एकही मत मिळाले नाही. हॅरिस यांच्या निवडीसाठी राबविलेली प्रक्रिया ही साम्यवादी चीनची आठवण करून देणारी आहे. आरोग्याशी निगडित समस्या लपविणे शक्य नसल्याने डेमोक्रॅटिक पक्षांच्या नेत्यांना बायडेन यांचे नाव राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेतून हटवावे लागले. यानंतर त्यांनी अल्प लोकशाही प्रक्रियेने हॅरिस यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केल्याचा आरोप टीमने केला आहे.