अमेरिकेत कमला करणार कमाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 12:28 PM2024-07-28T12:28:56+5:302024-07-28T12:29:28+5:30

जो बायडेन यांनी अमेरिकी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर उपाध्यक्ष कमला हॅरिस निवडणूक  रिंगणात आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे...

kamala harris will do the magic in america | अमेरिकेत कमला करणार कमाल?

अमेरिकेत कमला करणार कमाल?

विनय उपासनी, मुख्य उपसंपादक 

अमेरिकेत माशी जरी शिंकली तरी त्याचे पडसाद जगभर उमटत असतात. याचे कारण जगाची अमेरिकाकेंद्री अर्थव्यवस्था. म्हणूनच अमेरिकेत दर चार वर्षांनी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेले असते. अमेरिकेच्या अध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार निवडून येतो की डेमोक्रॅटिक पक्षाचा, यावर जगभर पैजा लागतात, भांडवली बाजारांचे निर्देशांक बागबुग होतात, चीन-रशियासारख्या आडदांड देशांच्या गुप्तचर संस्था पडद्यामागे राहून त्यात ढवळाढवळ करत राहतात. एवढे या निवडणुकीचे महत्त्व आहे. 

माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोव्हेंबरात होऊ घातलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात आपली टोपी फेकल्यापासून या रंगत प्राप्त झाली. त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनीही उत्साहाने प्रचाराला सुरुवात केली. मात्र, वयोमान आणि विसराळूपणा यामुळे बायडेनबाबांनी आपली टोपी उचलून घेतली. त्यामुळे विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना घरबसल्या उमेदवारी प्राप्त झाली. अध्यक्षीय निवडणुकीत कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर मात केली, तर अमेरिकेच्या इतिहासात त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरणार आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्रस्ताळा प्रचार आणि बायडेन यांचा सातत्याने अधोरेखित होणारा अजागळपणा यामुळे अध्यक्षीय उमेदवारांच्या लोकप्रियतेचा काटा आधीच ट्रम्प यांच्याकडे झुकला होता. त्यातच त्यांच्यावर पेनसिल्व्हेनिया येथील प्रचारसभेत गोळीबार झाल्याने ट्रम्प यांच्या बाजूने अमेरिकेत सहानुभूतीची प्रचंड लाट निर्माण झाली. पण, कमला यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीची गणिते बदलली आहेत. कमला यांचे नाव जाहीर होताच लोकप्रियतेचा काटा हळूहळू डेमोक्रॅटिक पक्षाकडे झुकायला सुरुवात झाली आहे. 

पेशाने वकील असलेल्या कमला यांना उमेदवारी मिळणे, ही समस्त भारतीयांसाठी सुखावणारी बाब आहे. याचे कारण त्यांचे मूळ भारतीय असणे. १९९० मध्ये कॅलिफोर्निया या आपल्या गृहराज्यातूनच वकिलीला सुरुवात केली. २०२० मध्ये त्यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी करून पाहिली; परंतु त्यावेळी बायडेन यांच्यावर विश्वास दर्शविल्याने कमलाबाईंनी उमेदवारी मागे घेतली हाेती. आता इतिहास घडविण्यापासून त्या फक्त एक पाऊल दूर आहेत.

Web Title: kamala harris will do the magic in america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.