Bajwa on Imran Khan: सौदीचा प्रिन्स अन् इम्रान खानमध्ये एवढे चांगले संबंध बनलेले की... किंगने नंबर ब्लॉक केलेला; बाजवांचे मोठे गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 09:38 PM2023-02-10T21:38:03+5:302023-02-10T21:39:25+5:30
एक काळ असा होता की इम्रान खान आणि सलमान यांच्यात चांगले संबंध निर्माण झाले होते. क्राऊन प्रिन्स सलमानने इम्रान खानला एक हॉटलाइन नंबरही दिला होता...
पाकिस्तानच्या राजकारणात सध्या काय सुरु आहे, हे तेथील लोकही सांगू शकत नाहीएत. परंतू आज पाकिस्तानच्या राजकारणात भूकंप येईल असे वक्तव्य माजी सैन्य प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी केले आहे. इम्रान खान यांनी एका बैठकीवेळी सौदीच्या प्रिंसला अत्यंत अश्लिल बोलले होते. यामुळे क्राऊन प्रिंसने त्यांचा नंबर ब्लॉक केला होता, असा दावा बाजवा यांनी केला आहे.
काबीनाच्या एका बैठकीवेळी इम्रान खान यांनी मोहम्मद बिन सलमान वर हे शब्द वापरले होते. "पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याबाबत पंजाबी भाषेत अतिशय आक्षेपार्ह शब्द वापरला होता.", असे बाजवांनी म्हटले आहे.
त्यांच्या एका मंत्र्याने त्यांच्या या वागणुकीची मला माहिती दिली होती. हे सांगताना बाजवा यांनी त्या मंत्र्याचे नाव मात्र सांगितले नाही. जावेद चौधरी यांनी बाजवा यांच्याशी झालेल्या या संवादाचा उल्लेख त्यांच्या साप्ताहिक स्तंभात केला आहे. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी पाकिस्तानी पत्रकार जावेद चौधरी यांना मुलाखत दिली होती.
एक काळ असा होता की इम्रान खान आणि सलमान यांच्यात चांगले संबंध निर्माण झाले होते. क्राऊन प्रिन्स सलमानने इम्रान खानला एक हॉटलाइन नंबरही दिला होता ज्यावर तो कधीही उपलब्ध होऊ शकत होता. मात्र या घटनेनंतर सौदीच्या राजकुमारने इम्रान खानचा नंबरही ब्लॉक केला होता, असे बाजवा म्हणाले.
इम्रान खान पंतप्रधान राहिले असते तर पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले असते, असा दावा बाजवा यांनी केला आहे. तेहरीक-ए-इन्साफ पक्ष देशासाठी धोका असल्याचे बाजवा यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांनी राजीनामा दिला तेव्हा मी त्यांना एक मॅच हरलीय, दुसरी बाकी आहे असे सांगत तसे न करण्यास सांगितले होते. इम्रान खान यांना नॅशनल असेंब्लीचा राजीनामा देऊ नये असा सल्ला दिल्याचा दावाही बाजवा यांनी केला आहे.
बांगलादेशातील खालिदा झिया यांचे उदाहरण दिले होते. संसदेचा राजीनामा दिल्यानंतर राजकीयदृष्ट्या खूप त्रास सहन करावा लागला होता. मात्र, इम्रान यांनी काहीही ऐकले नाही. मी त्यांचे सरकार पाडले नाही, असा खुलासा बाजवा यांनी केला. माझा गुन्हा एवढाच की मी त्यांचे सरकार वाचविले नाही. त्याची तशी अपेक्षा होती. परंतू मी देशहित पाहिले. मी खान यांना पाठिंबा दिला असता आणि सन्मानाने निवृत्ती घेतली असती, परंतु मी माझ्या सन्मानापेक्षा देशाचे भले महत्त्वाचे मानले आहे, असे बाजवा म्हणाले.