‘युनो’कडून पाकच्या पत्रास केराची टोपली!
By admin | Published: October 15, 2014 01:40 AM2014-10-15T01:40:58+5:302014-10-15T03:00:16+5:30
श्मीरमध्ये हस्तक्षेप करा, तिथे जनमत घ्या, असा गळा काढणा-या पाकला संयुक्त राष्ट्राने चांगलीच चपराक मारली असून
संयुक्त राष्ट्रे : काश्मीरमध्ये हस्तक्षेप करा, तिथे जनमत घ्या, असा गळा काढणा-या पाकला संयुक्त राष्ट्राने चांगलीच चपराक मारली असून, संयुक्त राष्ट्राने या मागणीकडे सरळ दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्हे, तर काश्मीर प्रश्न भारत व पाक यांनी वाटाघाटीतून सोडवावा, असा सल्लाही दिला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी संयुक्त राष्ट्राचे प्रमुख बान की मून यांना पत्र लिहून अलीकडे भारत-पाक सीमेवर निर्माण झालेल्या तणावाची माहिती दिली होती़ पण त्यात भारताकडूनच गोळीबार होत असल्याचा खोटा आरोप करून स्वत:ची बाजू उजळ दाखविण्याचा प्रयत्न केला होता. हा तणाव कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करावा, अशी मागणीही केली होती. काश्मीर समस्येवर तोडगा काढण्यात संयुक्त राष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावू शकते, अशी मखलाशीही केली होती.
बान यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी या संदर्भात पत्रकारांशी बोलताना या पत्राबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना संयुक्त राष्ट्राने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या निवेदनाचा उल्लेख केला. या निवेदनात भारत व पाक यांनी वाटाघाटीतून काश्मीर प्रश्न सोडवावा, असा सल्ला बान की मून यांनी दिला होता. भारत व पाकिस्तान यांच्यातील सीमा नियंत्रण रेषेवर हिंसाचार वाढल्यामुळे दोन्ही बाजूंकडे नागरिकांचे मृत्यू होत असून, मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतरित होत आहेत, याबद्दल मून यांनी चिंता व्यक्त केली होती.