कराचीत चिनी अधिकाऱ्याची हत्या; चीनच्या अब्जावधींच्या प्रकल्पाचं भवितव्य धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 05:32 PM2018-02-13T17:32:52+5:302018-02-13T17:43:45+5:30
पाकिस्तानात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने राहणा-या चिनी नागरिकांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मागच्याच आठवडयात पाकिस्तानच्या कराची शहरात चेन झ्यु या चिनी नागरिकाची हल्लेखोरांनी दिवसाढवळया गोळया झाडून हत्या केली.
लाहोर - पाकिस्तानात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने राहणा-या चिनी नागरिकांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मागच्याच आठवडयात पाकिस्तानच्या कराची शहरात चेन झ्यु या चिनी नागरिकाची हल्लेखोरांनी दिवसाढवळया गोळया झाडून हत्या केली. त्यामुळे पुन्हा एकदा चिनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची शहरात वेगवेगळया देशांचे दूतावास आहेत. त्या भागात ही हत्या झाली.
हल्लेखोराने 46 वर्षीय चेन यांच्या दिशेने नऊ गोळया झाडल्या. दुस-या दिवशी जिन्ना रुग्णालयात चेन यांचा मृत्यू झाला. ते शांघाय स्थित कॉस्को शिपिंग लाइन्स कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. 1994 पासून ही कंपनी पाकिस्तानात व्यवसाय करत आहे. कराची पोलिसांनी दहशतवादविरोधी पथकाकडे या प्रकरणाचा तपास दिला आहे. चीन आणि पाकिस्तानला जोडणा-या सीपीईसी प्रकल्पात इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीसाठी चीनने 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे.
याआधी सुद्धा या प्रकल्पावरील नाराजीतून अनेक चिनी नागरिकांची पाकिस्तानात हत्या झाली आहे. कराचीतील हत्येमुळे चीनने पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. चिनी नागरिकांचा विचार करता त्यांच्या जीवाला असणारा धोका वाढत जाणार आहे असे माजी लष्करी अधिकारी इकराम सेहगल यांनी सांगितले. पाथफाईंडर ग्रुप या पाकिस्तानातील सर्वात मोठया सुरक्षा कंपनीचे ते चेअरमन आहेत.
सीपीईसी प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी लष्कराने 15 हजाराची विशेष फोर्स उभी केली आहे. सीपीईसी प्रकल्पामुळे चीनचा शिनजियांग प्रात आणि पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदर जोडले जाणार आहे. सीपीईसी प्रकल्पाच्या कामात अनेक अडथळे आले आहेत. ऑक्टोंबर महिन्यात पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातील कामगारांच्या वसतिगृहावर अज्ञात आरोपींनी ग्रेनेड हल्ला केला होता. या ग्रेनेडच्या स्फोटात 26 कामगार जखमी झाले होते.
हे बंदर सीपीईसी प्रकल्पाचा भाग आहे. ग्वादर बंदर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे. या भागात विपुल साधन संपत्ती आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीपीईसी प्रकल्पाला बलुचिस्तानमध्ये मोठा विरोध आहे. हे बंदर पश्चिम चीनला मध्यपूर्व आणि युरोपशी जोडणार आहे. या प्रकल्पासाठी काम करणा-या चिनी नागरीकांवर यापूर्वीही इथे हल्ले झाले आहेत.
वसतिगृहात कामगार जेवायला बसलेले असताना दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने ग्रेनेड फेकले अशी माहिती पोलीस अधिकारी इमाम बक्षी यांनी दिली. पाकिस्तान नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर करत असल्याने बलुचिस्तानातल्या अनेक गटांचा सीपीईसी प्रकल्पाला विरोध आहे. बलुचिस्तानमध्ये अनेक दहशतवादी सुद्धा सक्रीय आहेत. दहशतवादी हल्ले करुन इथे सुरु असलेल्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. 2014 पासून आतापर्यंत बलुचिस्तानात 50 कामगारांची हत्या झाली आहे.