श्रीलंका हल्ल्यामागे काश्मीर कनेक्शन; प्रशिक्षण घेतल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 03:29 PM2019-05-04T15:29:39+5:302019-05-04T21:56:14+5:30
भारतात दहशतवाद्यांनी जाण्यामागच्या उद्देशाबाबत आपल्याला पूर्ण माहिती नसल्याचेही सांगितले.
कोलंबो : दोन आठवड्यांपूर्वी श्रीलंकेतील चर्च आणि हॉटेलांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये प्रशिक्षण देण्यात आल्याचा दावा श्रीलंकेच्या सेना प्रमुखांनी केला आहे. याचबरोबर हे दहशतवादी बंगळुरु आणि केरळच्या काही भागातही जाऊन आल्याचे लेफ्टनंट जनरल महेश सेनानायके यांनी सांगितले. यावर भारताने खुलासा करताना या दहशतवाद्यांचे भारतात आल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले आहे.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला आहे. भारतात दहशतवाद्यांनी जाण्यामागच्या उद्देशाबाबत आपल्याला पूर्ण माहिती नसल्याचेही सांगितले. मात्र, ते कशाचेतरी प्रशिक्षण किंवा दुसऱ्या दहशतवादी संघटनांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्नशील होते. तसेच दहशतवाद्यांनी घडविलेल्या स्फोटांवरून हा कट स्थानिक नसून बाहेरील शक्तींची मदत आहे.
21 एप्रिलला झालेल्या 8 साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 253 लोक मारले गेले होते. यामध्ये 10 भारतीयांसह 39 विदेशी नागरिकही होते. भारताकडून हल्ल्य़ाची माहिती मिळूनही सुरक्षा करण्यात अपयश आले. आमच्या सैन्याने वेगळ्याच दिशेने तपास केला. मात्र, यासाठी कोणाला दोषी ठरवता येणार नसल्याचे सेनानायके म्हणाले.
यापुढे मदरशांना सरकार नियंत्रित करणार आहे. याबाबत कोमताही वाद नको म्हणून रानील विक्रमसिंघे यांनीच हा निर्णय घेतला आहे. जे धर्मगुरु टुरिस्ट व्हिसावर मदरशांमध्ये कार्यरत होते त्यांना मायदेशी पाठवून देण्यात येणार आहे. दहशतवादी लपलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्फोटके सापडली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आयएसचे झेंडे, लष्कराचा गणवेश, सुसाईड जॅकेट, 150 जिलेटिन कांड्या आणि ड्रोन कॅमेरे सापडल्याचे सेनानायके यांनी सांगितले.