काश्मीर भारताचे होते, आहे अन् राहील, संयुक्त राष्ट्रात भारताने पाकला खडसावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 11:34 AM2023-03-05T11:34:44+5:302023-03-05T11:35:15+5:30
तुर्की, ओआयसीला ढवळाढवळ न करण्याचा सल्ला
जिनेव्हा : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. पाकचे लोक पोटापाण्यासाठी तळमळत आहेत. परंतु त्यांचे भारतविरोधाचे खूळ सुटत नाही, असा घणाघात भारताच्या मुत्सद्दी सीमा पूजानी यांनी केला.
दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी यूएनएचआरसीमध्ये भारतावर खोटे आरोप केले होते. त्याला पूजानी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पाकला दहशतवादी देश संबोधत तो भारताविरुद्ध अपप्रचार करत असल्याचे त्या म्हणाल्या. एवढेच नाही तर पूजानी यांनी तुर्कस्तान व इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) प्रतिनिधींनी जम्मू आणि काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावरही खेद व्यक्त केला. जम्मू-काश्मीरचा मुद्दा हा आमचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे या विषयावर भाष्य करणे टाळा, असा सल्ला त्यांनी तुर्की आणि ओआयसीला दिला. जम्मू-काश्मीर व लडाख हा संपूर्ण प्रदेश भारताचाच भाग होता, आहे व कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. (वृत्तसंस्था)
पाकने मानवाधिकारावर बोलणे हाच मोठा विनोद
पाकिस्तानी मंत्र्यांच्या तोंडून मानवाधिकाराची चर्चा ऐकणे म्हणजे विनोद आहे. आवाज उठवणारे पाकिस्तानात गायब होतात. पाकिस्तानच्या स्वतःच्या चौकशी आयोगाकडे गेल्या दशकात बेपत्ता व्यक्तींच्या ८,४६३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
जे भारतातील अल्पसंख्याकांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतात त्यांनी आधी स्वतःच्या अंगणात डोकावले पाहिजे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना धार्मिक स्वातंत्र्य नाही. ते त्यांच्या धर्माचे पालन करू शकत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
काय म्हणाल्या होत्या पाकच्या मंत्री
गेल्या गुरुवारी पाकच्या मंत्री हिना रब्बानी खार यांनी भारताचे नाव न घेता पारंपरिक व अपारंपरिक शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावर चिंता व्यक्त केली होती.
यामुळे दक्षिण आशियातील सामरिक स्थैर्य आणि पाकच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे त्या म्हणाल्या होत्या.