साहित्याचे नोबेल ब्रिटिश लेखक कॅशुओ इशिग्युरो यांना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 04:45 PM2017-10-05T16:45:48+5:302017-10-05T16:50:33+5:30
जगातील सर्वोच्च आणि सर्वाधीक सन्मानाचे समजले जाणारे नोबेल पुरस्कार गेले तीन दिवस जाहीर होत आहेत. वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज साहित्याचे नोबेल जाहीर करण्यात आले.
स्टाँकहोम- जगातील सर्वोच्च आणि सर्वाधीक सन्मानाचे समजले जाणारे नोबेल पुरस्कार गेले तीन दिवस जाहीर होत आहेत. वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज साहित्याचे नोबेल जाहीर करण्यात आले. यंदाचे साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दलचे नोबेल ब्रिटिश लेखक कॅशुओ इशिग्युरो यांना जाहीर झाले आहे.
इशिग्युरो यांचा जन्म जपानमध्ये नागासाकी येथे झाला. त्यांचे कुटुंब १९६०मध्ये इंग्लंडला स्थायिक झाले. अँन आर्टिस्ट आँफ द फ्लोटिंग वर्ल्ड, द रिमेन्स आँफ द डे, व्हेन वुई वेअर आँर्फन्स, नेव्हर लेट मी गो ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.
गेल्यावर्षी साहित्याचे नोबेल गायक, गीतकार बाब डिलन यांना जाहीर करुन नोबेल समितीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे यावर्षी हा सन्मान कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. डिलन यांनी अमेरिकन गीतप्रकारामध्ये दिलेल्या योगदानाची नोंद घेत त्यांचा सन्मान केला जात असल्याचे नोबेल समितीने गेल्या वर्षी म्हटले होते.
२७ नोव्हेंबर १८९५ रोजी आल्फ्रेड नोबेलने पँरिसमध्ये त्याच्या शेवटच्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली. त्यामध्ये आपण मिळवलेल्या संपत्तीमधून वैद्यकशास्त्र, साहित्य, रसायनशास्त्र, शांतता आणि पदार्थविज्ञान या क्षेत्रात योगदान देणार्या लोकांचा सन्मान करावा असे त्याने लिहून ठेवले होते. १९०१ पासून हे सन्मान देण्यास सुरुवात झाली. आजवर पदार्थविज्ञानाचे ११०, रसायनशास्त्राचे १०८, वैद्यकशास्त्राचे १०७, साहित्याचे १०९, शांततेचे ९७, अर्थशास्त्राचे ४८ नोबेल देण्यात आहेत. यावर्षी जेफ्री सी हाँल, मायकल रोशबॅश, मायकल यंग यांना वैद्यकशास्त्राचे, रेइनर वेईस, बेरी बॅरिश व किप थाँर्न यांना पदार्थविज्ञानाचे तर जॅक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रॅक, रिचर्ड हेंडरसन यांना रसायनशास्त्राचे नोबेल देण्यात आले. रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नोबेल मिळवणारे ते आशियातील पहिले नागरिक होते. त्याचबरोबर हरगोविंद खुराणा, सी. व्ही. रमण, मदर तेरेसा, अमर्त्य सेन, कैलाश सत्यार्थी, व्ही.एस नायपॉल, सुब्रमण्यन चंद्रशेखर, व्यंकटरमण रामकृष्णन या भारतीय किंवा भारतीय वंशाच्या लोकांना नोबेल मिळाले तर भारताशी संबंधित असणार्या रोनाल्ड रॉस, रुडयार्ड किपलिंग आणि दलाई लामा यांचाही नोबेलने सन्मान करण्यात आलेला आहे.