भारतात संभाळून राहा, चीनने आपल्या नागरीकांसाठी जारी केली अॅडव्हायजरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 06:57 PM2017-08-24T18:57:21+5:302017-08-24T19:00:13+5:30
डोकलाम मुद्यावर भारताला वारंवार धमकी देऊनही फारसे काही हाती लागत नसल्याने चीनने आता अन्य मार्गांनी भारताला डिवचण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली, दि. 24 - डोकलाम मुद्यावर भारताला वारंवार धमकी देऊनही फारसे काही हाती लागत नसल्याने चीनने आता अन्य मार्गांनी भारताला डिवचण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी चिनी सैन्याने लडाखमध्ये केलेली घुसखोरी याच रणनितीचा एक भाग होता. चीनने आता भारतात राहणा-या आपल्या नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी अॅडव्हायजरी जारी करुन डिवचले आहे.
यापूर्वी जुलै महिन्यात चीनने अशी अॅडव्हायजरी जारी केली होती. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि संसर्गजन्य रोगांपासून संभाळून राहण्याचे आपल्या नागरीकांना आव्हान केले होते. ताजी अॅडव्हायजरी नवी दिल्लीतील चिनी दूतावासातून जारी करण्यात आली आहे. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 31 डिसेंबरपर्यंत ही अॅडव्हायजरी वैध असेल. यापूर्वी 8 जुलैला जारी केलेले अॅडव्हायजरी 7 ऑगस्टपर्यंत वैध होती.
खरतर भारतामधल्या ज्या धोक्यांकडे चीन लक्ष वेधतोय तेच धोके चीनमध्ये सुद्धा आहेत. चीनमधल्या जनतेला वारंवार नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. तिथेही आजाराची कमतरता नाही.
भारतीय सैन्य दल तोडीस तोड आहे हे माहित असूनही मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चीन भारताला युद्धाची धमकी देत आहे. डोकलाममधून भारताने सैन्य मागे घेतले म्हणून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली समस्या लगेच मिटणार नाही. सैन्य मागे घेणे ही फक्त चीनकडून घालण्यात आलेली एक पूर्वअट आहे. भारताने डोकलाममधून सैन्य मागे घेतले तरी, चीन सहजासहजी हा विषय सोडणार नाही. भारताने जी काही आक्रमक, चिथावणीखोर कृती केली आहे त्याची किंमत भारताला चुकवावी लागेल असे यी हायलिन यांनी ग्लोबल टाइम्सशी बोलताना सांगितले. ते चीनच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंटरनॅशनल स्ट्रॅटजीचे संचालक आहेत.
भारताने चीनच्या भूमीवरुन सैन्य मागे घेतले नाही तर, चीनचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय सप्टेंबरआधीच भारताला अल्टिमेटम देईल असे चिनी लष्कराशी संबंधित असलेल्या दुस-या एका तज्ञाने सांगितले. हे अल्टिमेटम म्हणजे भारत आणि जगासाठी स्पष्ट संदेश असेल. चीन भारताला सैन्य मागे घेण्यासाठी ठराविक दिवसांची मुदत देईल. ती डेडलाईन संपल्यानंतर भारतीय सैन्य चिनी भूमीवर कायम असेल तर जे होईल त्याची संपूर्ण जबाबदारी भारताची असेल असे या तज्ञाने सांगितले. चीन शस्त्रसाठा आणि लष्करी तंत्रज्ञानात भारताला वरचढ आहे असे चिनी तज्ञांचे मत आहे. भारताच्या मागच्या काहीवर्षात रशिया आणि अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे विकत घेतली आहेत.