केनियात विद्यापीठावर हल्ला, ७० ठार
By admin | Published: April 2, 2015 11:51 PM2015-04-02T23:51:02+5:302015-04-02T23:51:02+5:30
केनियातील विद्यापीठावर बंदूकधाऱ्यांनी गुरुवारी केलेल्या हल्ल्यामध्ये ७० ठार, तर ७९ जण जखमी झाले. हल्लेखोरांचे चेहरे झाकलेले होते
नैरोबी : केनियातील विद्यापीठावर बंदूकधाऱ्यांनी गुरुवारी केलेल्या हल्ल्यामध्ये ७० ठार, तर ७९ जण जखमी झाले. हल्लेखोरांचे चेहरे झाकलेले होते. त्यांनी वसतिगृहाला लक्ष्य करीत अंदाधुंद गोळीबार केला. हल्ल्याची एकूण पद्धत पाहता सोमालियन दहशतवादी संघटनेचे कृत्य वाटते, असे सूत्रांनी सांगितले.
गॅरीस्सा युनिव्हर्सिटी कॉलेजवर पहाटे हा हल्ला झाला. बहुतांश लोक तेव्हा झोपेत होते. गोळीबाराच्या आवाजाने विद्यापीठ परिसरात प्रचंड दहशत पसरली, असे या हल्ल्यातून बचावलेला विद्यार्थी आॅगुस्टीन अलान्गा (२१) याने एका वृत्तसंस्थेला सांगितले. हा गोळीबार लगेच तीव्र झाला, असे तो म्हणाला. प्रचंड गोळीबारामुळे अनेक विद्यार्थ्यांना आहे तेथेच कोंडून घेणे भाग पडले तर काही जणांनी पळ काढला. बंदूकधारी पळणाऱ्यांवर पाठीमागून गोळीबार करीत होते. मी किमान पाच सशस्त्र, चेहरा झाकलेले बंदूकधारी पाहिले. मी अनवाणी पळालो. पळताना पडून मला दुखापत झाली, असे तो म्हणाला. हल्ला झाला तेव्हा विद्यापीठ परिसरातील मशिदीत पहाटेची नमाज सुरू होती. तेथील विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला नाही. (वृत्तसंस्था)
या हल्ल्यात १५ ठार, तर ६० जण जखमी झाल्याचे गॅरीस्सा शहरातील शवगृह सेवकाने सांगितले. काही गंभीर जखमींना विमानाने नैरोबीला नेण्यात आले, असे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.
विद्यापीठातील तीन ते चार वसतिगृहे रिकामी करण्यात आली असून हल्लेखोरांना एका वसतिगृहात घेरण्यात आले आहे, असे राष्ट्रीय आपत्ती मोहीम केंद्राने टिष्ट्वटरवर सांगितले. केनियाच्या सैन्यदलाने विद्यापीठ परिसराला वेढा घातला असून अधिक तपशील मिळू शकला नाही. बंदूकधाऱ्यांनी विद्यापीठ वसतिगृहाच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षकांवर गोळीबार केल्यानंतर जोरदार चकमक उडाली. हल्लेखोर वसतिगृहात घुसण्यात यशस्वी झाल्यामुळे ओलिस नाट्य घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.