केरळच्या ड्रायव्हरने अबुधाबीत जिंकली २ कोटींची लॉटरी; ५० वर्ष काम करुनही इतकी कमाई नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 11:36 PM2020-05-05T23:36:41+5:302020-05-05T23:36:57+5:30
शानवास यांनी ही सोडत मॉल मिल्यनेअर कॅम्पेनमध्ये जिंकली. अबुधाबीच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून उन्हाळ्यात रिटेल अबुधाबी समर सेल्स ४७ दिवस चालवला जातो
नवी दिल्ली : अब्दुल सलाम शानवास (४३, रा. थिरुवनंतपुरम, केरळ) या वाहनचालकाने अबुधाबीत २,७२,२६० अमेरिकन डॉलर्सची (२,०६,१३,४८५ रुपये) सोडत (ड्रॉ कॉन्टेस्ट) मॉल रॅफल जिंकली, असे वृत्त शनिवारी ‘खलीज टाइम्स’ने दिले. ‘खलीज टाइम्स’शी बोलताना अब्दुल सलाम शानवास म्हणाले की, ‘मी पन्नास वर्षेही काम केले असते, तर या रकमेच्या जवळपास जाणारी कमाई करू शकलो नसतो. मी येथे १९९७ मध्ये रिकाम्या हातांनी पण खूप अपेक्षा घेऊन आलो होतो.
मी वाहनचालकाचा परवाना घेऊन शारजाहमध्ये काम सुरू केले; परंतु फार काही बचत करू शकलो नाही. तेथून मी अबुधाबीला फॅमिली ड्रायव्हर म्हणून आलो व आता माझी कमाई ही ६५० अमेरिकन डॉलर्सची (४९,२०० रुपये) आहे.’
शानवास यांनी ही सोडत मॉल मिल्यनेअर कॅम्पेनमध्ये जिंकली. अबुधाबीच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून उन्हाळ्यात रिटेल अबुधाबी समर सेल्स ४७ दिवस चालवला जातो. ही सोडत त्याचाच एक भाग होती. शानवास यांनी या सोडतीत भाग घेण्यासाठी ५४ अमेरिकन डॉलर्स खर्च केले. ‘मी सोडतीत विजयी ठरल्याचे मला गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी सांगण्यात आले व त्याची अधिकृत घोषणा होईपर्यंत हे गुपित ठेवण्यासही बजावले. मी केरळमध्ये असलेल्या माझ्या कुटुंबालादेखील हे सांगितले नाही. मी पत्नीला एवढेच म्हणालो की, खूप मोठे आश्चर्यकारक असे काही आहे,’ असे शानवास म्हणाले.
तथापि, शानवास यांच्यासाठी सगळे काही साधे सोपे नव्हते. सोडतीसाठी नोंदणी केल्यावर त्यांना पाठविण्यात आलेला संदेश त्यांनी डिलीट करून टाकलेला होता. ‘मला तो एसएमएस सापडला नाही. त्यावेळी मला सौम्यसा हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला; परंतु नशिबाने संघटकांनी मीच विजेता असल्याची खात्री माझा फोन नंबर व इतर तपशील ताडून करून घेतली,’ असे ते म्हणाल्याचे वृत्तात म्हटले आहे. शानवास यांना आता कायमस्वरूपी घर बांधायचे आहे. माझ्याकडील थोड्याशा बचतीवर मी नुकताच एक प्लॉट विकत घेतला होता. २०२१ मध्ये घराचे बांधकाम मला सुरूही करायचे होते. हे पैसे अगदी योग्यवेळी आले आहेत, असे ते म्हणाले.