सौदी अरेबियात तेल विहिरींवर हल्ले; भारतात पेट्रोल-डिझेलच्या दराचा आणखी भडका उडणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 08:08 PM2021-03-08T20:08:47+5:302021-03-08T20:09:39+5:30
Saudi Arabian oil site attacked: सौदी अरेबियातील तेल उत्पादन होणाऱ्या विहिरी आणि ठिकाणांवर हल्ले झाले आहेत.
सौदी अरेबियातील तेल उत्पादन होणाऱ्या विहिरी आणि ठिकाणांवर हल्ले झाले आहेत. याचाच परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातही दिसून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत तब्बल ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असताना त्यात आता आणखी भर पडण्याची दाट शक्यता आहे.
कच्च्या तेलाचा एका बॅरलचा दर ७१.३७ अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्याच किंमतीत वाढ झाल्यानं परिणामी त्यातून उत्पादन होणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांच्याही किंमतीत वाढ होते. त्यात भारताला सर्वाधिक खर्च खनिज तेल आयातीवर करावा लागतो. देशात आधीच पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठली आहे. त्यात आता सौदी अरेबियातील तेल विहिरींवरील हल्ल्यामुळं पेट्रोलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
तेल विहिरींवर हल्ला झाल्याचं सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयानंही मान्य केलं आहे. इराणचा पाठिंबा असलेल्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या रास तनुरा टर्मिनलवर हल्ला केला होता.