खलिस्तानी समर्थकांचा धुडगूस, परदेशात तिरंग्याचा अपमान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 05:11 AM2023-03-21T05:11:27+5:302023-03-21T05:11:46+5:30
लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांनी उच्चायुक्तालयाचा तिरंगा काढून टाकला होता. रविवारी सायंकाळी समर्थक उच्चायुक्तालयाबाहेर जमले.
लंडन : अमृतपाल सिंग याच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ खलिस्तानी समर्थकांनी परदेशात धुडगूस घातला आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड केल्यानंतर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करण्यात आला आहे. या तोडफोडीच्या घटनेचा सोमवारी नवी दिल्लीत निषेध करण्यात आला.
लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांनी उच्चायुक्तालयाचा तिरंगा काढून टाकला होता. रविवारी सायंकाळी समर्थक उच्चायुक्तालयाबाहेर जमले. इमारतीत घुसून तिरंगा उतरवण्याचा प्रयत्न केला. यावर भारताने तीव्र आक्षेप घेत दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तांना बोलावून घेतले. दरम्यान, आता उच्चायुक्तालयावर आणखी मोठा तिरंगा डौलाने फडकत आहे. खलिस्तान समर्थकांच्या हातात खलिस्तानी झेंडे आणि अमृतपाल सिंग याचे पोस्टर होते. आंदोलकांचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि तिरंगा अभिमानाने फडकत असल्याचे उच्चायुक्तांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दूतावासाचे दरवाजे तोडले
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्येही भारतीय दूतावासावर हल्ला झाला. रविवारी येथेही खलिस्तान समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. या लोकांनी स्प्रे पेंट्सने अमृतपालची सुटका करा...असे लिहिले.
त्यांनी दूतावासाचे दरवाजे तोडले. तेथे खलिस्तानचे झेंडे फडकविण्यात आले. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय अमेरिकन नागरिकांनी केली आहे.