अमेरिकेत बांधणार काश्मीरमधील खीर भवानीचे मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 11:46 AM2017-08-01T11:46:03+5:302017-08-01T11:48:06+5:30
काश्मीर खो-यातील खीर भवानी मंदिराची प्रतिकृती अटलान्टामध्ये साकारण्यात येणार असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.
वॉशिंग्टन, दि. 1 - काश्मीर खो-यातील खीर भवानी मंदिराचे दर्शन आता तुम्हाला अमेरिकेतही घेणे शक्य होणार आहे. कसे??? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला आहे का तर याचे उत्तर आम्ही पटकन देतो. काश्मीर खो-यातील खीर भवानी मंदिराची प्रतिकृती अटलान्टामध्ये साकारण्यात येणार असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.
मीडियाद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील काश्मिरी लोकांनी येथे खीर भवानी मंदिराची प्रतिकृती साकारण्यासाठी जवळपास 20,000 डॉलर रुपये जमवले आहेत. अमेरिकेत अशा प्रकारचे हे पहिले मंदिर असेल, असेही या काश्मिरींचं म्हणणे आहे. काश्मीर ओव्हरसीज असोसिएशन (केओए)चे आर्किटेक्ट तेज कौल यांनी सांगितले की, खीर भवानी मंदिराच्या प्रतिकृतीचं डिझाइन तसंच योजनेवर काम सुरू आहे. अटलान्टातील शिव मंदिरच्या 11.4 एकर परिसरात खीर भवानी मंदिर उभारण्यात येणार आहे.
कौल यांनी सांगितले की, काश्मीरमधील हे मंदिर शिंपल्यातील मोत्याप्रमाणे चमकते. मंदिर उभारणीसाठी संगमरवराचाही वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या मध्य भागी संगमरवराची छत्रीदेखील आहे. अटलान्टातील काश्मिरींची अशी अपेक्षा आहे की येथेही अशाच प्रकारेच खीर भवानीचे भव्यदिव्य मंदिर असावे.
खीर भवानी मंदिर
जम्मू काश्मीरमधील गान्दरबल जिल्ह्यातील तुलमुला गावात खीर भवानीचे मंदिर आहे. पारंपरिक प्रथेनुसार वसंत ऋतूमध्ये या मंदिरात खीरचा नैवेद्य देवीला जातो, यावरुन खीर भवानी असे नाव देवीला मिळाले. महारज्ञा देवी म्हणून देखील ही देवता ओळखली जाते.