खुर्शीद पाकमध्ये जाऊन मोदीवर बरसले, तर शरीफ यांचे कौतुक केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2015 12:48 PM2015-11-13T12:48:51+5:302015-11-13T12:52:27+5:30
क्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या पाकच्या प्रयत्नांना भारताने योग्य प्रतिसाद दिला नाही असे सांगत काँग्रेस नेते व माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी मोदींवर टीका केली आहे.
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. १३ - दक्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या पाकच्या प्रयत्नांना भारताने योग्य प्रतिसाद दिला नाही असे सांगत काँग्रेस नेते व माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी मोदींवर टीका केली आहे. खुर्शीद यांनी पाकमध्ये झालेल्या एका सेमिनारमध्ये हे विधान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
गुरुवारी इस्लामाबादमधील जीना इन्स्टिट्यूट येथे सलमान खुर्शीद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना थेट नरेंद्र मोदींवर टीका केली तर दुसरीकडे नवाझ शरीफ यांचे कौतुक केले. पाकिस्तानमध्ये एक्सप्रेस ट्रिब्यूनमधील वृत्तानुसार खुर्शीद म्हणाले, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून त्यांची दूरदृष्टी दाखवली. पण भारतातील सरकार पाकिस्तानच्या शांततेच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
नरेंद्र मोदी सध्या राजनेता होण्याचे धडे गिरवत असून भारताला पाकिस्तानसोबतची चर्चा पुढे न्यायची असेल तर मोदींनी इस्लामाबादमधील सत्ता केंद्राला अस्थिर करण्याऐवजी त्यांचे लक्ष ठेवले पाहिजे असा सल्लाही त्यांनी मोदींना दिला आहे. १९४७ पासून जगाने अनेक किचकट प्रश्नावर तोडगा काढला. पण भारत - पाकिस्तानमधील वाद अजूनही कायम आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाविरोधात पाकिस्तानच्या मोहीमेचे खुर्शीद यांनी कौतुक केले आहे.
भारत - पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असतानाच भारतातील नेत्याने पाकिस्तानमध्ये जाऊन देशातील सत्ताधा-यांवर टीका केल्याने वाद निर्माण झाला आहे.