आयएसने सिरियन सैनिकांना ठार मारले
By Admin | Published: August 28, 2014 02:34 AM2014-08-28T02:34:02+5:302014-08-28T02:34:02+5:30
इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी रविवारी सिरियाचा तबका हवाईतळ ताब्यात घेतल्यानंतर सिरियाच्या लष्करी जवानांना ठार मारले किंवा ओलिस ठेवले आहे.
बैरूत : इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी रविवारी सिरियाचा तबका हवाईतळ ताब्यात घेतल्यानंतर सिरियाच्या लष्करी जवानांना ठार मारले किंवा ओलिस ठेवले आहे. या अतिरेक्यांच्या समर्थकांनी इंटरनेट किंवा टिष्ट्वटरवर या जवानांची छायाचित्रे अपलोड केली आहेत.
सलग पाच दिवस संघर्ष केल्यानंतर इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी सिरियाच्या लष्कराला नामोहरम करून रक्का शहराजवळ असलेला हा तबका हवाईतळ रविवारी ताब्यात मिळविला. इस्लामिक स्टेट ही अल् कायदाची शाखा आहे. या संघर्षात ५०० पेक्षा जास्त बळी गेले आहेत, असे सिरियन आॅब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईटस्ने म्हटले आहे. पाच दिवसांच्या या संघर्षात इस्लामिक स्टेटचे ३४६ जण, तर सिरियाचे १७० जवान ठार झाले.
तबका हा लष्कराचा मोठा तळ होता. अन्यथा इराक आणि सिरियाचा फार मोठा भाग या अतिरेक्यांच्या ताब्यात आधीच गेला आहे. इंटरनेटवर अपलोड केलेल्या एका छायाचित्रात इस्लामिक स्टेटचे अतिरेकी गुडघे टेकलेल्या अवस्थेतील सात जणांना गोळ्या घालून ठार मारत असल्याचे दिसते. मरण पावलेले हे सात जण सिरियन लष्कराचे जवान असल्याचे स्पष्ट झाले. (वृत्तसंस्था)