Pakistan : पाकिस्तानात खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाडची हत्या, घरात घुसून घातल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 04:46 PM2023-05-06T16:46:24+5:302023-05-06T16:47:20+5:30
पाकिस्तानातील लाहोरमध्ये खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड याची हत्या करण्यात आलीये.
पाकिस्तानातील लाहोरमध्ये खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड याची हत्या करण्यात आलीये. पजवाड हा खलिस्तान कमांडो फोर्सचा म्होरक्या होता आणि त्यानं पाकिस्तानातूनदहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या होत्या. १९९० मध्ये तो भारतातून पळून पाकिस्तानात लपला होता. लाहोरच्या जोहर शहरातील सनफ्लॉवर सोसायटीमध्ये अज्ञात दुचाकीस्वारांनी घुसून परमजीत सिंग पंजवाड याच्यावर गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पजवाड हा मलिक सरदार सिंग हे नाव वापरून लाहोरमध्ये राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सहा वाजता हल्लेखोर दुचाकीवरून सोसायटीत घुसले होते. हल्लेखोरांनी परमजीतसिंग पंजवाड याच्यावर हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला.
चंडीगढ बॉम्बब्लास्टचा मास्टरमाईंड
३० जून १९९९ रोजी पंजवाडनं पासपोर्ट कार्यालयाजवळ बॉम्ब स्फोट घडवला होता. यामध्ये चार जण जखमी झाले होते. तर अनेक गाड्यांचं नुकसान झालं होतं. एका स्कूटरमध्ये बॉम्ब लपवून ठेवण्यात आला होता असं सांगण्यात आलेलं. पोलिसांनी नंतर पानिपतमधून स्कूटरच्या मालकाला अटक करून चौकशी केली होती.
दहशतवाद्यांच्या यादीत नाव
परमजीत सिंग पंजवाड हा पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील झब्बल गावचा रहिवासी होता. तो पूर्वी पंजाबमधील सोहल येथील बँकेत काम करत होता. नंतर तो पंजाबमध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात आला आणि त्याने स्वतःची दहशतवादी संघटना खलिस्तान कमांडो फोर्सची स्थापना केली. भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयानं २०२० मध्ये दहशतवाद्यांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये परमजीत सिंग पंजवाडचं नाव होतं. १९९० मध्ये भारतीय सुरक्षा दलांचा घाबरून त्यानं पाकिस्तानात पळ ठोकला होता.