आत्मघाती हल्ल्यात पाकस्थित पंजाबच्या गृहमंत्र्यांची हत्या
By admin | Published: August 16, 2015 10:25 PM2015-08-16T22:25:21+5:302015-08-16T22:25:21+5:30
आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला स्फोटाने उडवून देत पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गृहमंत्री शुजा खानझादा यांची हत्या केली. या भीषण हल्ल्यात पोलीस उपअधीक्षकासह अन्य
लाहोर : आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला स्फोटाने उडवून देत पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गृहमंत्री शुजा खानझादा यांची हत्या केली. या भीषण हल्ल्यात पोलीस उपअधीक्षकासह अन्य १३ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. लष्कर-ए-झांगवी या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त डॉन न्यूजने गृहमंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे.
शादी खेलस्थित गावातील शुजा खानझादा यांच्या घरातील कार्यालयात घुसून या आत्मघाती हल्लखोराने हा भीषण हल्ला केला.
अभ्यागत म्हणून आत्मघाती हल्लेखोराने शुजा यांचे घर आणि कार्यालयात असलेल्या इमारतीत प्रवेश मिळविल्यानंतर त्याने स्फोटाने स्वत:ला उडवून दिले. या हल्ल्यात अन्य १७ जण जखमी झाले आहेत. हा आत्मघाती स्फोट एवढा भीषण होता की, स्फोटात इमारतीचे छत कोसळले. कोसळलेल्या छताच्या ढिगाऱ्याखाली गृहमंत्री शुजा आणि अन्य ३० जण गाडले गेले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली आहे.
पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार सईद इलाही यांनी गृहमंत्री शुजा खानझादा या आत्मघाती हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. त्यांचे पार्थिवर अटॉक येथील जिल्हा इस्पितळात हलविण्यात आल्याचे इलाही यांनी सांगितले.
या हल्ल्यात पोलीस उपअधीक्षक शौकत शाह हेही ठार झाल्याचे रावळपिंडी परिक्षेत्राचे आयुक्त झाहीद सईद यांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.