Lockdown in China: किलोभर तांदूळ हवेत?- तुमचं स्मार्टवॉच द्या! चीनमधील लॉकडाऊनचे भयावह चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 06:52 AM2022-01-08T06:52:37+5:302022-01-08T06:53:30+5:30
कोरोना नंतर वेगानं संपूर्ण जगात पसरला असला तरी तुलनेनं चीननं मात्र त्यावर चांगलंच नियंत्रण मिळविल्याचं दिसलं.
तुम्ही घरात अडकून पडला आहात. तुमच्या शहरात कडक टाळेबंदी लावलेली आहे. एकेक करता तुमच्या घरातल्या खाण्या-पिण्याच्या वस्तू संपत चालल्या आहेत. घराबाहेरच पडायची बंदी असल्याने तुमच्याजवळ रोख पैसेही नाहीत. अशावेळी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी तुम्ही काय कराल?
- तर किलोभर तांदळाच्या बदल्यात तुमच्या मनगटावरचं महागडं स्मार्ट वॉच काढून ते निमूट दुकानदाराला द्याल!
- ही काही सिनेमाची कथा नाही, हे आहे कोरोनाच्या भयग्रस्ततेने व्यापलेल्या चीनच्या पोलादी पडद्याआड टाळेबंदीत कोंडलेल्या नागरिकांचे वर्तमान! कोरोनाची पहिली लाट चीननं अक्षरश: दाबून टाकली. त्यासाठी जे जे करता येईल, ते ते सारं त्यांनी केलं. त्यामुळे कोरोना नंतर वेगानं संपूर्ण जगात पसरला असला तरी तुलनेनं चीननं मात्र त्यावर चांगलंच नियंत्रण मिळविल्याचं दिसलं.
कोरोना पुन्हा आपल्या वाट्याला येऊ नये यासाठी त्यांनी आता आणखी पुढची पायरी गाठली आहे, पण त्यामुळे नागरिकांपुढे अक्षरश: जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना परवडला; पण सरकारी अटी आणि बंधनं नकोत, असं आता नागरिकांनाही वाटायला लागलं आहे. काही दिवसांपूर्वी हेनान प्रांतातील युत्जू या शहरात कोरोनाचे केवळ तीन नवे रुग्ण समोर आले होते. या तीनही रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणं नव्हती. तरीही प्रशासनानं संपूर्ण युत्जू शहरातच लॉकडाऊन केलं होतं.
चीननं असाच निर्णय २३ डिसेंबर २१ रोजी जिआन शहरासाठीही लागू केला होता आणि संपूर्ण शहरच लॉकडाऊन करून टाकलं. त्यामुळे या शहरातले तब्बल १.३ कोटी लोक घरातच अडकून पडले आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून दोन आठवड्यांपूर्वी शिन्जियांग प्रांतातही १५ लाख लोकांना घरातच बंदिस्त केलं गेलं.
अतिशय आजारी असलेल्या व्यक्ती, तसेच अपवादात्मक परिस्थितीत पूर्वपरवानगी घेऊनच थोड्या काळासाठी नागरिकांना बाहेर पडता येईल असा फतवाच प्रशासनानं काढला आहे. नागरिकांनी सांगितलेलं कारण जर अधिकाऱ्यांना पटलं नाही, तर त्यांना कडक शिक्षाही ठोठावण्यात येत आहे. चार फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकदरम्यान कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठीही चीननं कोरोना रुग्णांवर डोळ्यांत तेल घालून पहारा सुरू केला आहे.
जियानसारख्या शहरात तर परिस्थिती अतिशय वाईट आहे. सरकारनं लॉकडाऊन तर जारी केलं, लोकांना जबरदस्तीनं घरात कोंडलं, पण त्यांच्या जीवनावश्यक गोष्टींच्या पूर्ततेसाठी मात्र काहीही केलं नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. घरात अडकून पडल्यामुळे लोकांचे प्रामुख्याने हाल होत आहेत, ते खाण्या-पिण्याचे. लोकांची अक्षरश: उपासमार होत आहे. त्यामुळे अनेक जण आजारी तर पडले आहेतच, पण अनेकांजवळ रोजच्या खर्चासाठी पैसाही उरलेला नाही. त्यामुळे पुरातन काळासारखी वस्तुविनिमयाची पद्धत येथे सुरू झाली आहे. खाद्यपदार्थांचे दर इतके प्रचंड प्रमाणात वाढले आहेत, की जगण्यासाठी लोकांना आता घरातील वस्तूही विकाव्या लागत आहेत. त्यात प्रामुख्याने गॅजेटस् आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. अर्थात या वस्तू लोक विकत असले, तरी त्याबदल्यात त्यांना पैसे मिळत नाहीत, तर जरूरीचे खाद्यपदार्थ घ्यावे लागत आहेत.
जियान शहरातील एका तरुणानं सांगितलं, तांदुळाचं पाकीट विकत घेण्यासाठी मला माझं स्मार्टवॉच द्यावं लागलं!
लोकांकडे एक तर रोख पैसे नाहीत, त्यात खायला अन्न नसल्यानं विक्रेत्यांनीही अशा नडलेल्या लोकांकडून महागड्या गॅजेटस्ची लूट चालविली आहे. खाद्यपदार्थांचे अनेक विक्रेते तर आता लोकांकडून पैशांऐवजी अशा वस्तूंचीच मागणी करीत आहेत. अशा लुटीच्या व्यवहारांच्या बातम्या आणि मनोगतंही आता झपाट्यानं सोशल मीडियावर पसरू लागली आहेत.
एकविसाव्या शतकातून आपण पुन्हा आदिम काळात आलोय की काय, असं चीनमधल्या टाळेबंदीत अडकून पडलेल्या या लोकांना वाटू लागलंय. वस्तूच्या बदल्यात वस्तू ही क्रूर व्यवस्था असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावरही त्यावरून रान उठलं आहे, पण सरकारला या गोष्टीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यांना काहीही करून कोरोना पुन्हा पसरू द्यायचा नाही. एवढी महागडी गॅजेटस् डाळ-तांदळासारख्या स्वस्त वस्तूंसाठी द्यावी लागल्याने नागरिकांचा संताप मात्र वाढतो आहे.
भाज्यांसाठी सॅनिटरी पॅडची देवाणघेवाण!
चीन प्रशासनाचं म्हणणं काहीही असलं, तरी यासंदर्भात सोशल मीडियावरील नेटकरी मात्र आक्रमक आहेत. तिथे अनेक फोटो आणि व्हिडिओही टाकले गेले आहेत. सोशल मीडिया साइट ‘विबो’वर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये बटाट्यांसाठी कापूस, कोबीसाठी सिगारेट, सफरचंदांसाठी डिश वॉशिंग लिक्विड तर भाज्यांसाठी सॅनिटरी पॅडची देवाणघेवाण होत असल्याचेही दिसून आले. असाहाय नागरिक यापेक्षा अधिक करू तरी काय शकतील, असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे.