किम जोंग उन आणि मून जे इन यांच्यात आजपासून पुन्हा चर्चा, तीन दिवसांची परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 08:28 AM2018-09-18T08:28:38+5:302018-09-18T09:59:26+5:30
पॅनमुन्जोम येथे ऐतिहासिक सीमेवर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तेव्हा कोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल, युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न होतील, द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त होईल असे संकेत मिळाले.
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून- जे- इन आणि उत्तर कोरियाचे एकाधिकारशाह किम- जोंग-उन यांच्यामध्ये आजपासून तीन दिवसांची चर्चा परिषद होत आहे. १८ ते २० सप्टेंबर असे तीन दिवस उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे हे दोन्ही नेते पुन्हा एकदा भेटणार आहेत. त्यासाठी मून स्वत: विमानाने सोल ते प्योंगयांग असा विमानप्रवास करुन गेले आहेत.
१९५३ साली दोन्ही देशांनी युद्धाला अर्धविराम दिल्यानंतर ६५ वर्षांनंतर शांततेच्या दृष्टीने पावले पडत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात दोन्ही देशांमध्ये नव्याने चर्चेस सुरुवात झाली. ६५ वर्षांमध्ये प्रथमच उत्तर कोरियाच्या एकाधिकारशहाने सीमा ओलांडून दक्षिण कोरियात प्रवेश केला. पॅनमुन्जोम येथे ऐतिहासिक सीमेवर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तेव्हा कोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल, युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न होतील, द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त होईल असे संकेत मिळाले.
मात्र हे संकेत आजिबातच स्पष्ट नसल्याचे त्यांच्या बैठकीनंतर काहीच दिवसांमध्ये उघड झाले. किम जोंग उन यांना अण्वस्त्रांचा त्याग करायचा आहे असे आपल्या अधिकाऱ्यांशी ते बोलल्याचा दावा द. कोरियाचे अध्यक्ष मून यांनी केला होता. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प व किम यांची सिंगापूरच्या सेंटोसा बेटावर भेट झाली. यामध्ये अण्वस्त्रमुक्तीसाठी कोणताही ठोस विचार करण्यात आला नाही. तेव्हाच किम आणि मून भेट तकलादूच होती हे स्पष्ट झाले. आता मात्र दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून यांना किमकडून अण्वस्त्रमुक्तीसाठी काहीतरी ठोस वदवून घ्यावे लागणार आहे. ट्रम्प यांच्या प्रशासनाचा बेभरवशीपणाचाही या शांतताप्रक्रीयेवर परिणाम होत आहे. अमेरिकेचे सेक्रेटरी आॅफ स्टेट माइक पोम्पेओ यांनी अचानक उत्तर कोरियाची भेट रद्द करणे त्याचेच प्रतिबिंब म्हणता येईल.
DPRK leader #KimJongUn welcomes South Korean President #MoonJaein at Pyongyang International Airport. The two greets each other with a hug and then inspect the guards of honor, with a huge crowd waving flowers in the background, live broadcast at a press center in Seoul shows. pic.twitter.com/lZS1pYPt1u
— China Plus News (@ChinaPlusNews) September 18, 2018
पोम्पेओ यांची भेट रद्द झाल्यावर ट्रम्प प्रशासन मन मानेल तसे वागते, एकतर्फी निर्णय घेते असा आरोप करण्याची उत्तर कोरियाला पुन्हा संधी मिळाली. यासवार्चा परिणाम शांतता चर्चेवर परिणाम होईल आणि आंजारून गोंजारून शांत केलेलं किम नावाचं शिंगरु पुन्हा उधळेल अशी भीती मून यांना वाटते. आजपासून होत असलेल्या भेटीमध्ये अण्वस्त्रमुक्तीच्या चर्चेची गाडी रुळावरुन खाली घसरू नये यासाठी त्यांना प्रयत्न करायचे आहेत. त्यातच आपल्या आर्थिक सहाकार्य स्वप्नाचे घोडे दामटायचे आहे. गेली अनेक वर्षे दक्षिण कोरिया उत्तर कोरियाबरोबर आर्थिक सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे. दोन्ही कोरियामध्ये रेल्वेवाहतूक पुन्हा सुरु व्हावी, मालवाहतूक व्हावी तसेच नैसर्गिक वायू व इंधन भूमार्गाने दक्षिणेत यावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
‘ट्रम्प’तात्या अन् ‘किम’काका!
संपूर्ण शांतता हे जरी दूरचे स्वप्न असले तरी आधी अशी सहकार्याची लहान पावलं टाकली पाहिजेत असे मत मून यांचे आहे. त्यामुळे एखादा तकलादू द्वीपक्षीय जाहिरनाम्याचे कागद नाचवून फोटो काढण्यापेक्षा दक्षिण कोरियाला काहीतरी ठोस मिळवून देण्यावर त्यांचा भर आहे. अर्थात हे सर्व किम जोंग उनच्या लहरीवर आणि भूमिकेवर अवलंबून असेल. नाही म्हणायला गेली ६५ वर्षे चाललेले युद्ध यावर्षअखेरीपर्यंत पूर्ण थांबवावे यावर पॅनमुन्जोम बैठकीत एकमत झाले आहे. किमानपक्षी हे युद्ध तांत्रिकदृष्ट्या संपावे यासाठी मून यांची धडपड सुरु आहे. इतकी वर्षे उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाचा मुख्य भूमिकेशी संपर्क तोडून या देशाला एकटं पाडलं आहे. जगाशी जोडले जाण्यासाठी केवळ विमान आणि जहाजांवर अवलंबून राहणं आणि एखाद्या बेटाप्रमाणे जिणं मून यांना नको आहे. त्यासाठीच त्यांनी शांततेसाठी धडपड चालवली आहे. एक चांगली बाब म्हणजे नुकतेच उत्तर कोरियाच्या केसाँग शहरामध्ये लायझन आॅफिस सुरु करण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा संवाद सुरु करण्यासाठी अत्यंत सोपे जाणार आहे.
South Korean Pres. #MoonJaeIn is greeted by North Korean leader #KimJongUn on tarmac as he begins a 3-day visit, with all eyes on whether the latest #InterKoreanSummit will see breakthrough in stalled denuclearization talks.https://t.co/kHKHMA1rtF#남북정상회담#南北首脳会談
— Kyodo News - English (@kyodo_english) September 18, 2018
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जपानने आपल्या शस्त्र खाली टाकले आणि कोरियातून माघार घेतली. साडेतीन दशकांहून अधिक काळ चालवलेली वसाहत जपानने सोडली पण कोरियाचा प्रश्न कायम राहिला. सुरुवातीच्या काळात रशिया आणि चीनच्या बळावर उत्तर कोरिया लढत राहिला. नंतर त्याला या देशांच्या थेट टेकूची गरज राहिली नाही. आता अण्वस्त्र आणि कथित हायड्रोजन बॉम्बच्या धमक्यांवर किम जोंग उनने अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. सात दशकांहून अधिक काळ चिघळलेल्या, शीतयुद्धातही कायम धगधगत राहिलेला कोरियाचा निखारा आता खरंच शांत होईल की नाही हे आताच सांगता येणार नाही. सध्या तरी किम जोंग उन काय म्हणतात हे पाहाणे आपल्या हातामध्ये आहे.
किम जोंग यांनी खुलेआम केली एका सेनाधिकाऱ्याची 90 गोळ्या झाडून हत्या, काय आहे कारण?