चीन मैत्रीला जागला! उत्तर कोरियाचा हुकूमशहा कीम जोंग उनला पाठवली कोरोनाची लस
By मोरेश्वर येरम | Published: December 1, 2020 12:35 PM2020-12-01T12:35:44+5:302020-12-01T12:39:44+5:30
चीनमध्ये सुरू असलेल्या लशींच्या निर्मितीपैकी एक लस उत्तर कोरियाच्या हुकूमशहासाठी पाठवून देण्यात आली आहे.
प्योंगयांग
चीननेउत्तर कोरियासोबतच्या मैत्रीला जागत हुकूमशहा किम जोंग उन आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसाठी कोरोना लशीचे डोस पाठवून दिले आहेत, असा दावा अमेरिकेतील अभ्यासकांनी जपानी गुप्तहेरांच्या सहाय्याने केला आहे. चीनमध्ये अंतिम टप्प्यात या लशीची चाचणी सुरू आहे. किम जोंग उन यांच्यासोबतच उत्तर कोरियाच्या अनेक बड्या अधिकाऱ्यांना या लशीचे डोस देण्यात आल्याचा दावा सेंटर फॉर दी नॅशनल इंट्रेस्टचे अधिकारी हॅरी काजियानिस यांनी केला आहे.
हॅरी यांच्या म्हणण्यानुसार, "चीनमध्ये सुरू असलेल्या लशींच्या निर्मितीपैकी एक लस उत्तर कोरियाच्या हुकूमशहासाठी पाठवून देण्यात आली आहे. नेमकी कोणती लस पाठविण्यात आली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यासोबतच या लशीच्या सुरक्षिततेबाबतही काही कळू शकलेलं नाही. किम जोंग उन आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गेल्या दोन-तीन आठवड्यांपू्र्वी चीन सरकारची लस देण्यात आली आहे."
तीन कंपन्यांकडून लशीची निर्मिती
चीनमध्ये सध्या तीन कंपन्या कोरोनावरील लशीची निर्मिती करत असल्याची माहिती अमेरिकेचे शास्त्रज्ञ पीटर जे होटेज यांनी दिली. यात Sinovac Biotech Ltd, CanSinoBio आणि Sinopharm या कंपन्यांचा समावेश आहे. Sinopharm कंपनीने त्यांच्या लशीचा चीनमध्ये १० लाख लोकांनी वापर केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या तिन्ही कंपन्यांपैकी एकाही कंपनीने आपल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचाणीचा अहवाल अद्याप प्रसिद्ध केलेला नाही.
उत्तर कोरियाने अद्याप देशात एकाही कोरोना रुग्णाची माहिती दिलेली नाही. पण उत्तर कोरियात कोरोनाचा फैलाव झालेला नाही, हे वृत्त दक्षिण कोरियाच्या गुप्तहेर खात्याने फेटाळून लावले आहे. उत्तर कोरिया आणि चीन यांचे मोठ्या प्रमाणात व्यापारी संबंध आहेत. याच काळात कोरोनाचा प्रसार सुरू झाला होता असं म्हटलं जात आहे.