“चिथावणीखोर कृतीला जशास तसे उत्तर द्या, मग अमेरिका असो वा दक्षिण कोरिया”: किम जोंग उन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 12:25 PM2024-01-01T12:25:33+5:302024-01-01T12:25:40+5:30
North Korea Kim Jong Un News: किम जोंग उन हे चीन आणि रशियासोबत आपले सैन्य मजबूत करण्यासाठी काम करत आहे.
North Korea Kim Jong Un News:उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी सैन्याला स्पष्ट शब्दांत आदेश दिले आहेत. कुणीही देशाविरोधात चिथावणीखोर कृत करत असेल, तर त्याला जशास तसे उत्तर द्या. अगदी अमेरिका किंवा दक्षिण कोरिया या राष्ट्रांनी चिथावणीखोर काही केले, तरी मागे हटू नका, असे किम जोंग उन यांनी म्हटले आहे. उत्तर कोरियात सत्ताधारी पक्षाची एक महत्त्वाची बैठक झाली. पाच दिवस चाललेल्या या बैठकीत किम जोंग उन यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या.
सन २०२४ मध्ये आणखी तीन लष्करी गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्येच उत्तर कोरियाने आपला पहिला लष्करी गुप्तचर उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला होता. किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाच्या लष्कराच्या कमांडिंग अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपली लष्करी तयारी मजबूत करण्याची गरज आहे. आमच्या सैन्याने आवश्यक ती सर्व पावले उचलली पाहिजेत आणि आपल्याविरोधात कारवाई करणाऱ्या देशांना कठोर अद्दल घडवली पाहिजे. यासाठी सैन्याने क्षणभरही संकोच करू नये, असे किम जोंग उन यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे.
उत्तर कोरियाचा स्थायी शांतता निर्माण करण्यावर भर
वास्तविक उत्तर कोरियाचे प्रजासत्ताक स्थायी शांतता सामर्थ्याने निर्माण करत आहे. प्रतिस्पर्ध्याच्या सद्भावनेवर अवलंबून असलेली विनम्र शांतता नाही. संघर्षाच्या प्रसंगी सैन्याने संपूर्ण प्रदेशाचा ताबा घेण्याची वेळ आल्यास आण्विक शस्त्रांसह सर्व उपलब्ध मार्गांचा वापर केला पाहिजे, असे स्पष्ट आदेश किम जोंग उन यांनी दिल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, किम जोंग उन हे चीन आणि रशियासोबत आपले सैन्य मजबूत करण्यासाठी काम करत आहे. उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा साठा वाढवण्यावर भर देत असल्याचा दावा केला जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर कोरियाकडे २० ते ३० अणुबॉम्ब ते १०० पेक्षा जास्त घातक बॉम्ब असू शकतात, असा दावा करण्यात येत आहे.