किम जोंग उनचा कारनामा! आवडती फुलं उमलली नसल्यानं माळ्यांना दिली थरकाप उडवणारी शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 03:55 PM2022-02-17T15:55:32+5:302022-02-17T15:57:29+5:30
उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचा नवा कारनामा; फुलं वेळेत उमलली नाहीत म्हणून माळ्यांना सुनावली शिक्षा
उत्तर कोरियाचा क्रूर हुकूमशहा किम जोंग उन सुनावत असलेल्या कठोर शिक्षा संपूर्ण जगाला माहीत आहेत. उनकडून दिल्या जात असलेल्या शिक्षांची जगभर होत असते. यामध्ये आता आणखी एका शिक्षेची भर पडली आहे. किमचे वडील किम जोंग इल यांच्या जयंतीला स्मारक आणि देशातील रस्त्यांवर किमजोंगिलिया बेगोनिया फुलांची सजावट करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र फूल उमलली नसल्यानं किमनं माळ्यांना शिक्षा सुनावली. त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली.
कोठडीत पाठवण्यात आलेल्या माळ्यांना आता अंग मेहनतीची कामं करावी लागतील. १६ फेब्रुवारीला किमच्या वडिलांची जयंती होती. त्याआधी किमजोंगिलिया बेगोनिया फुलं उमलायला हवीत अशी सूचनाच किमनं केली होती. मात्र माळी अपयशी ठरले. त्यामुळे त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. किमचे वडील आणि माजी हुकूमशहा किम जोंग इल यांच्या नावावरूनच फुलाचं किमजोंगिलिया बेगोनिया असं नामकरण करण्यात आलं.
उत्तर रियानगांग प्रांतातल्या समसू काऊंटीतील एका शेती व्यवस्थापकाला कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सहा महिन्यांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. थंडीच्या मोसमात ग्रीन हाऊसमध्ये गरजेइतकी उष्णता निर्माण करणं व्यवस्थापकाला जमलं नाही. त्याला जळणासाठीचं लाकूड उपलब्ध झालं नाही. त्यामुळे रोपटी खराब झाली. त्यामुळे किम जोंग उननं त्यांना शिक्षा सुनावली. इतर माळ्यांच्या रवानगीदेखील तुरुंगात करण्यात आली.