किम जोंग परवडले, त्यांची क्रूरकर्मा बहीण नको; ती खरोखरच ‘कातील’ आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 06:55 AM2022-04-12T06:55:56+5:302022-04-12T06:56:13+5:30

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा देशातील दरारा सगळ्यांना माहीत आहे. किम जे काही बोलतील, जे काही करतील, तो तेथील जनतेसाठी जणू ‘कायदा’ समजला जातो.

kim jong un sister kim jo yong more dangerous | किम जोंग परवडले, त्यांची क्रूरकर्मा बहीण नको; ती खरोखरच ‘कातील’ आहे!

किम जोंग परवडले, त्यांची क्रूरकर्मा बहीण नको; ती खरोखरच ‘कातील’ आहे!

Next

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा देशातील दरारा सगळ्यांना माहीत आहे. किम जे काही बोलतील, जे काही करतील, तो तेथील जनतेसाठी जणू ‘कायदा’ समजला जातो. त्यामुळेच किम जोंग उन ज्या प्रकारचे कपडे घालतील, ती लगेच तिथे फॅशन होते. त्यांनी जसे केस कापले, तशीच केसांची स्टाईल देशातील लोक करायला लागतात, म्हणजे त्यांना करावी लागते. त्यांच्या शब्दाबाहेर देशातला कोणताही नागरिक जाऊ शकत नाही. कोणी त्यांच्या विरुद्ध गेलं तर  ती व्यक्ती पुढे कधीच सापडत नाही, असा इतिहास आहे. उत्तर कोरियाचा क्रूरककर्मा म्हणून हे किम महाशय ओळखले जातात. त्यामुळेच त्यांनी खुद्द अमेरिकेचीही  कधीच भीडभाड ठेवलेली नाही. जगानं कोणतेही आणि कितीही निर्बंध लादले, तरी अण्वस्त्र निर्मितीचा आपला कार्यक्रमही त्यांनी कायम पुढेच रेटला आहे.

उत्तर कोरियात  किम जोंगची दहशत असली तरी त्यांची ३५ वर्षीय छोटी बहीण किम जो योंग ही त्यांच्यापेक्षाही अधिक क्रूरकर्मा आणि अधिक घातक समजली जाते. त्यात ती दिसायलाही सुंदर असल्यानं हे मिश्रण आणखीच खतरनाक असल्याचं तेथील अधिकारी आणि नागरिक यांचं म्हणणं आहे.
एवढंच नाही, किम जोंग उन अनेकदा ‘गायब’ होत असताना, त्यांच्या तब्येतीच्या कारणांवरुन ते कायम चर्चेत असताना त्यांच्यानंतर उत्तर कोरियाची ‘गादी’ त्यांची बहीण किम जो योंग सांभाळेल, असं म्हटलं जातंय. किम जोंग उन नागरिकांना अनेक दिवस न दिसल्याच्या घटना मागे अनेकदा घडल्या आहेत. या काळात त्यांचा मृत्यू झाल्याच्या अफवाही देशात पसरल्या होत्या. पण, प्रत्येक वेळी काही काळानंतर ते पुन्हा ‘प्रगट’ झाले होते. आपला उत्तराधिकारी कोण असावा, याबाबत किम जोंग उन यांनीदेखील जवळपास नक्की केलं आहे आणि त्यासाठी आपल्या लहान बहिणीला त्यांनी पुढे आणलं आहे. 

गेल्या काही वर्षांपासून तिच्या हातात प्रचंड ताकद तर किम जोंग उन यांनी दिली आहेच, पण किम जो योंग हीदेखील सतत त्यांच्या पाठीशी असते. ते जिथे कुठे जातील, तिथे तर ती असतेच, गेल्या काही काळापासून राजकारणाचे धडेही ती गिरवते आहे. तिच्या हुकुमाला नकार देण्याची ताकद कोणातही नाही. अतिशय थंड डोक्यानं, थोडीही विचलित न होता ती निर्णय घेते आणि आजवर आपल्याला नकोशा असलेल्या अनेक लोकांना तिनं कंठस्नान घातलं आहे, असं म्हटलं जातं. त्यामुळे एकवेळ किम जोंग उन बरे, पण त्याची बहीण नको, असा दरारा आजही तिच्याविषयी आहे. सुरुवातीपासूनच अतिशय महत्त्वाची पदं तिनं भूषवली आहेत आणि आता तर ती जणू सर्वेसर्वाच आहे.

किम जोंग उनची तब्येत नेहमीच डळमळीत असते. त्यामुळे आपले अनेक अधिकारही त्यांनी कधीच आपल्या लहान बहिणीकडे सुपूर्द केले आहेत. देशाची अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय रणनीतीही किम जो योंग हीच ठरवते. दक्षिण कोरियाला बरबाद करण्याची धमकीही गेल्या काही दिवसांत तिनं बऱ्याचदा दिली आहे. ती ‘बोलबच्चन’ नाही, जे बोलते ते ती करुन दाखवते, त्याबाबतचा निर्णय घ्यायला ती वेळही लावत नाही आणि एकदा तिनं एखादी गोष्ट ठरवली, की त्यापासून कोणी तिला परावृत्तही करू शकत नाही, अशी तिची ख्याती आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकीही तिनं बऱ्याचदा जाहीरपणे दिली आहे.  आपल्या कृत्याचे काय परिणाम होतील, याची कोणतीही फिकीर तिला नाही.

देशात होणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये किम जो योंग नेहमी सहभागी असते. २०१९ - २०मध्ये अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांच्याबरोबर झालेल्या शिखर बैठकांच्यावेळीही आपल्या भावाच्या पाठीमागे ती सावलीसारखी हजर होती. अशा बैठकांदरम्यान किम जोंग उन यांची केवळ विश्वासू सहकारी म्हणूनच नाही, तर त्यांची सल्लागार म्हणूनही ती काम करते.

दोघा बहीण - भावांमधले संबंधही अतिशय उत्तम आहेत. १९९० ते २००० या काळात दोघांनी सोबतच स्वीत्झर्लंड येथे शिक्षण घेतलं आहे. देशात परत आल्यानंतर तिनं प्योंगयांग येथील विश्वविद्यालयात कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीदेखील  घेतली. कोरिया वर्कर्स पार्टीचं कामही ती आता सांभाळते. विशेष म्हणजे इतर कोणाहीपेक्षा किम जोंग उन यांचा आपल्या लहान बहिणीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या वतीनं तिच निर्णय घेते. तिला जवळून ओळखणारे अनेक जण म्हणतात, ती खरोखरच ‘कातील’ आहे!

भावाच्या विरोधकांना तिनंच संपवलं!
किम जोंग उन आजारपणामुळे किंवा इतर काही कारणांमुळे जेंव्हा जनतेसमोर येऊ शकत नाहीत, तेंव्हा आपोआपच सारी सुत्रे किम जो योंग हिच्याकडेच येतात. आपल्या भावाच्या अनेक विरोधकांना तिच्या सांगण्यावरुनच कायमचं संपवण्यात आलं, असं म्हटलं जातं. एवढंच नाही, किम जोंग उन यांचा सावत्र भाऊ किम जोंग नाम याला संपवण्याचा आदेशही तिच्याच सांगण्यावरुन देण्यात आला होता, याबद्दल आजही अनेकांच्या मनात काहीच शंका नाही. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा किम जो योंग हीच असणार, ही काळ्या दगडावरची रेघ मानली जातेय.

Web Title: kim jong un sister kim jo yong more dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.