किम जोंग उन रशियाची शस्त्रास्त्रे पहायला गेला; किंझल मिसाईलवर नजर टिकली...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 01:53 PM2023-09-16T13:53:31+5:302023-09-16T13:53:51+5:30
किम बुधवारी रशियात पोहोचले होते. हजारो किमींचा ट्रेनचा प्रवास करून किम तिथे पोहोचले आहेत.
उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांना शस्त्रास्त्रे दाखविली. तसेच व्लादिवोस्तोक या पूर्वेकडील शहरातील पॅसिफिक फ्लीटमध्ये समाविष्ट असलेल्या युद्धनौकेचीही पाहणी केली. लढाऊ विमानांच्या इंजिन कारखान्याचा दौरा केला. यावेळी किमच्या नजरा किंझल मिसाईलवर टिकल्या होत्या.
किम बुधवारी रशियात पोहोचले होते. हजारो किमींचा ट्रेनचा प्रवास करून किम तिथे पोहोचले आहेत. पुतीन यांच्या भेटीत शस्त्रास्त्रे देवानघेवाणीवर दोन्ही देशांची चर्चा झाली. उत्तर कोरियाची शस्त्रे युक्रेन युद्धाला अधिक नुकसान पोहोचवू शकतात असा पाश्चात्य देशांचा कयास आहे. रशियन तंत्रज्ञानामुळे किमचे मनसुबे अधिक घातक होऊ शकतात अशी भीती या देशांना वाटत आहे.
उत्तर कोरियाचे नेते किम यांनी पूर्वेकडील कोमसोमोल्स्क शहरातील एका उत्पादन प्रकल्पाला भेट दिली आणि रशियाच्या Su-57 लढाऊ विमानाचे जवळून निरीक्षण केले. रशियन युद्धविमानांमध्ये युक्रेनमधील युद्धात वापरत असलेल्या Tu-160, Tu-95 आणि Tu-22 बॉम्बर यांचा समावेश आहे.
उत्तर कोरिया 1980 च्या दशकात सोव्हिएत युनियनकडून पाठवलेल्या युद्धविमानांवर अवलंबून आहे. व्लादिवोस्तोकमध्ये रशियन नौदलाची जहाजे पाहण्यावरून किम रशियाकडून मोठी खरेदी करणार असल्याचे संकेत आहेत. युक्रेनवरील रशियाचा हल्ला दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धाच्या रूपात आकार घेत आहे. अशा स्थितीत रशियाला शस्त्रास्त्रांची नितांत गरज भासू शकते आणि उत्तर कोरियाशी करार फायद्याचा ठरू शकतो. गेल्या वर्षी अमेरिकेने उत्तर कोरियावर रशियाला दारूगोळा, तोफखाना आणि रॉकेट पुरवल्याचा आरोप केला होता. युक्रेन युद्धासाठी दारुगोळा मिळविण्यासाठी पुतिन कोणत्याही थराला जाऊ शकतात.