King Charles III Coronation : "मी सेवा करायला आलोय", ब्रिटनचे राजे चार्ल्स (तृतीय) यांचा राज्याभिषेक संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 07:13 PM2023-05-06T19:13:34+5:302023-05-06T19:14:18+5:30
King Charles III Coronation : शनिवारी संध्याकाळी म्हणजेच 6 मे रोजी औपचारिकपणे राज्याभिषेक करताना कॅंटरबरीचे आर्चबिशप जस्टिन वेल्बी यांनी यावेळी किंग चार्ल्स यांना राजमुकूट घातला.
लंडन : किंग चार्ल्स (तृतीय) यांचा शनिवारी संध्याकाळी ब्रिटनचे राजे म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. किंग चार्ल्स यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यात आपल्या आई राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटनचे राजे ही पदवी स्वीकारली होती. यानंतर शनिवारी संध्याकाळी म्हणजेच 6 मे रोजी औपचारिकपणे राज्याभिषेक करताना कॅंटरबरीचे आर्चबिशप जस्टिन वेल्बी यांनी यावेळी किंग चार्ल्स यांना राजमुकूट घातला. जो इंग्लंडच्या राजाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.
आर्चबिशपने आपला राज्याभिषेक घोषित केल्यानंतर किंग चार्ल्स यांनी ख्रिश्चनांच्या पवित्र ग्रंथावर हात ठेवून शपथ घेतली. शपथ घेताना ते म्हणाले की, मी राज्य करण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आलो आहे. तसेच, राज्याभिषेकाला उपस्थित असलेल्यांनी 'गॉड सेव्ह द किंग' हे गीत गायले. आर्चबिशपने तेथे उपस्थित सर्व धर्माच्या लोकांना संबोधित केले. ते म्हणाले की, चर्च ऑफ इंग्लंड अशा वातावरणाला प्रोत्साहन देते ज्यामध्ये सर्व धर्माच्या लोकांचा समान आदर केला जातो. त्यानंतर चार्ल्स यांनी नेहमी कायद्याचे पालन करण्याची आणि विश्वासू प्रोटेस्टंट राहण्याची शपथ घेतली.
दरम्यान, किंग चार्ल्स यांचा हा औपचारिक राज्याभिषेक सोहळा ब्रिटनचे शाही चर्च म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्टमिन्स्टर ॲबे याठिकाणी झाला. ब्रिटनमधील नागरिकांचेच नव्हे तर जगभरातल्या अनेक लोकांचे लक्ष या राज्याभिषेक सोहळ्याकडे लागले होते. या वेळी हिंदू, शीख, मुस्लिम, बौद्ध आणि ज्यू समुदायांचे धार्मिक नेते आणि प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी क्वीन कॉन्सर्ट कॅमिला यांचाही राज्याभिषेक करण्यात आला. त्यांना कोणती शपथ घेण्यास सांगितले गेले नाही. तसेच, राजघराण्यातील सदस्यांचे आणि विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे सैन्याने स्वागत केले.
सिंहासनाचा काय आहे इतिहास?
राज्याभिषेकासाठी 700 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले सिंहासन वापरले. हे आसन सर्वात आधी एडवर्ड द कन्फेसर यांनी वापरले होते. हे सिंहासन 152 किलो दगडांपासून तयार करण्यात आले होते, त्याला स्टोन ऑफ डेस्टिनी असेही म्हणतात. स्कॉटलंडच्या राज्यकर्त्यांनी अनेक दशके त्याचा वापर केला होता. त्यानंतर इंग्लंडचे राजे एडवर्ड (प्रथम) यांनी 1296 मध्ये ते हस्तगत केले. पुढे 1603 मध्ये इंग्लंड आणि स्कॉटलंडचे राजघराणे एक झाले. माजी पंतप्रधान जॉन मेजर यांनी 1996 मध्ये ते स्कॉटलंडला परत केले होते. ते गेल्या आठवड्यात खास राज्याभिषेक सोहळ्यासाठी वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये परत आणले.