सीरियामध्ये इस्रायलचं तांडव! 48 तासांत 350 हल्ले अन्...; जाणून घ्या, 'ऑपरेशन बशान एरो'ची संपूर्ण स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 01:40 PM2024-12-11T13:40:50+5:302024-12-11T13:42:21+5:30
आयडीएफने मंगळवारी दिलेल्या माहिती नुसार, 48 तास चाललेली ही कारवाई "ऑपरेशन बशान एरो" अंतर्गत करण्यात आली. या कारवाईत असद यांच्या शासन काळातील जवळपास 80% सैन्य ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत...
इस्रायलनेसीरियामध्ये जबरदस्त हल्ले केले आहेत. बशर अल असद यांच्या शासन काळात त्यांनी आपल्या सैन्यासाठी तयार केलेल्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करत इस्रायलने त्या नष्ट केल्या. माध्यमांतील वृत्तांनुसार, अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित एचटीएसने सीरियातील सत्तेवर कब्जा केल्यानंतर, इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत.
आयडीएफने मंगळवारी दिलेल्या माहिती नुसार, 48 तास चाललेली ही कारवाई "ऑपरेशन बशान एरो" अंतर्गत करण्यात आली. या कारवाईत असद यांच्या शासन काळातील जवळपास 80% सैन्य ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत. जेरुसलेम पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, असद शासनाच्या पतनापासून आतापर्यंत इस्रायलने सीरियामध्ये 350 हून अधिक हल्ले केले आहेत.
सीरियातील सरकारी शस्त्रास्त्र साठे नष्ट करणे हाच या हल्ल्यामागील मुख्य उद्देश होता, असे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. यावेळी, इस्रायली नौदलाने अल बायदा आणि लताकिया या बंदरांवरही हल्ला केला, येथे सीरियन नौदलाची 15 जहाजे होती. याचवेळी सीरियातील विमानविरोधी बॅटरी, विमानतळ आणि शस्त्रास्त्र निर्मिती केंद्रेही नष्ट करण्यात आली. या हल्ल्यांत क्रूझ क्षेपणास्त्रे, पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणारी आणि पृष्ठभागावरून समुद्रात मारा करणारी क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, टाक्या आणि हेलिकॉप्टर यांचाही समावेश आहे.
शत्रूच्या हाती शस्त्रास्त्रे पडू नयेत यासाठी प्रयत्न -
इस्रायली प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सीरियन शस्त्रास्त्रे मिळवण्याचे हिजबुल्लाहचे प्रयत्न पाहता, शत्रूंच्या हाती कोणतेही शस्त्र पडू नये, याची काळजी घेतली जात आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला लिहिलेल्या पत्रात, हे हल्ले 'मर्यादित आणि तात्पुरते' आहेत. याचा उद्देश तत्काळ सुरक्षेचा आहे, असे इस्रायलने म्हटले आहे.
⭕ In 48 hours, the IDF struck most of the strategic weapons stockpiles in Syria to prevent them from falling into the hands of terrorist elements. 𝗛𝗲𝗿𝗲’𝘀 𝘁𝗵𝗲 𝗯𝗿𝗲𝗮𝗸𝗱𝗼𝘄𝗻:
— Israel Defense Forces (@IDF) December 10, 2024
⚓ Naval Operations: Israeli Navy missile ships struck 2 Syrian Navy facilities… pic.twitter.com/6N1fz7BiMF
गोलान हाइट्सची सुरक्षितता महत्वाची -
या हल्ल्यांचा मुख्य उद्देश्य सीरियन सीमेवरील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे. गोलान हाइट्स भागातील वाढता धोका लक्षात घेत ही कारवाई आवश्यक होती, असेही इस्रायलचे म्हणणे आहे.
दमास्कससह दक्षिण सीरियातील प्रमुख ठिकाणांना करण्यात आले लक्ष्य -
आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश हल्ले दक्षिण सीरिया आणि दमास्कस भागात करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये प्रमुख्याने हवाई संरक्षण यंत्रणा, जमिनीपासून पृष्ठभागावर आणि जमिनीपासून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, ईशान्य सीरियातील कमिशली हवाई तळ, होम्सच्या ग्रामीण भागातील शिनशर तळ आणि दमास्कसच्या नैऋत्येकडील अकरबा हवाई तळाला लक्ष्य करण्यात आले.