द. कोरियात सांडले अमेरिकी रक्त
By admin | Published: March 5, 2015 11:57 PM2015-03-05T23:57:41+5:302015-03-05T23:57:41+5:30
अमेरिकेचे दक्षिण कोरियातील राजदूत मार्क लिप्पर्ट यांच्यावर कोरियन ऐक्य समर्थकाने चाकूहल्ला केला. सेऊलमध्ये गुरुवारी सकाळी ही घटना घडली.
चाकूने वार : राजदूताला ८० टाके, कोरियन ऐक्यवाद्याचे कृत्य, राजधानीतील परिषदेत केला हल्ला
वॉशिंग्टन/सेऊल : अमेरिकेचे दक्षिण कोरियातील राजदूत मार्क लिप्पर्ट यांच्यावर कोरियन ऐक्य समर्थकाने चाकूहल्ला केला. सेऊलमध्ये गुरुवारी सकाळी ही घटना घडली. लिप्पर्ट यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्याला ८० टाके पडले आहेत. हल्लेखोर दोन्ही कोरियांचे एकत्रीकरण व्हावे, असे जोरजोराने ओरडत होता.
कोरिया समेट आणि सहकार्य परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात लिप्पर्ट सहभागी झाले होते. या परिषदेचा सदस्य असल्यामुळे हल्लेखोरही उपस्थित होता. लिप्पर्ट भाषण करू लागताच त्याने त्यांना खाली पाडून त्यांच्यावर चाकूने वार केले. यात लिप्पर्ट यांचा चेहरा आणि मनगटाला इजा झाली. लिप्पर्ट यांच्यावर दोन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची इजा प्राणघातक नाही, असे सूत्रांनी सांगितले. लिप्पर्ट यांना आणखी तीन ते चार दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे, असे सेऊल येथील योनसेई सेव्हरन्स हॉस्पिटलचे डॉ. जुंग नाम-शीक यांनी सांगितले.
हल्ल्यादरम्यान हल्लेखोर दक्षिण कोरिया व उत्तर कोरियाचे पुन्हा एकत्रीकरण व्हावे, असे ओरडत होता. कीम की-जोंग असे हल्लखोराचे नाव असून, तो एकत्रीकरणाचा कट्टर समर्थक आहे. त्याला जेरबंद करण्यात आले. पोलीस त्याची चौकशी करीत आहेत. कीम याने यापूर्वीही अशी बेभरवाशीची वर्तणूक केली आहे.
द. कोरियाकडून निषेध
दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष पार्क ग्युन-हे यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा केवळ अमेरिकी राजदूतावरील शारीरिक हल्ला नाही, तर तर तो द. कोरिया-अमेरिका आघाडीवरील हल्ला असून, असे प्रकार कधीही खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही राष्ट्राध्यक्षांनी दिला.
हा तर न्यायाचा चाकूहल्ला
अमेरिकी राजदूतावरील हल्ल्यावर त्वरेने प्रतिक्रिया देताना द. कोरिया व अमेरिकेचा पारंपरिक शत्रू उ. कोरियाने या हल्ल्याला न्यायाचा चाकूहल्ला असे संबोधले आहे. या हल्ल्यातून द. कोरियात अमेरिकेविरुद्ध असलेला रोष प्रतिबिंबीत होतो. अमेरिकी युद्धपिपासूंसाठी ही शिक्षा असल्याचेही उत्तर कोरियाच्या केसीएनए या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
हल्ल्यामागील तर्क
४कोरियात फूट पडण्यास अनेक दशके लोटली आहेत. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियात आता विस्तवही आडवा जात नाही.
४अमेरिकेने उ. कोरियाला प्रतिबंध म्हणून उभय देशांतील सीमेवर २८ हजार ५०० सैनिक तैनात केले आहेत. मात्र, द. कोरियातील काही लोकांना दोन्ही देश एकत्र होण्यात अमेरिकी सैन्याची सीमेवरील उपस्थिती अडसर असल्याचे वाटते. आजचा हल्ला हा अशाच विचारांचा परिपाक मानला जातो.
अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाकडून हल्ल्याचा निषेध
४लिप्पर्ट भाषण देत असताना त्यांना मारहाण झाली. आम्ही या हिंसक घटनेचा तीव्र निषेध करतो, असे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्या मारिया हार्फ म्हणाल्या. सेऊलमधील दूतावास स्थानिक पोलिसांच्या संपर्कात आहे, असेही त्यांनी सांगितले.