कुलभूषण यांची फाशी तूर्त टळली; असा आहे घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 06:34 AM2019-07-18T06:34:25+5:302019-07-18T06:36:33+5:30
भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांना ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेचा पाकिस्तानने फेरविचार करावा, असा आदेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी दिला.
दि हेग : हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया करण्याच्या आरोपावरून भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांना ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेचा पाकिस्तानने फेरविचार करावा, असा आदेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी दिला. यामुळे भारताचा मोठा विजय झाला व पाकिस्तानला चपराक बसली. फेरविचार होईपर्यंत या शिक्षेला दिलेली स्थगिती कायम राहणार असल्याने जाधव याची फाशीही टळली. न्यायालयाचा हा निकाल होताच, संपूर्ण भारताप्रमाणे न्यायालयाबाहेर जमलेल्या भारतीय नागरिकांनीही जल्लोष केला.
जेव्हा एखाद्या परकीय नागरिकावर दुसऱ्या देशात खटला चालविला जातो, तेव्हा त्या आरोपीस त्याच्या देशाच्या राजकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून मदत घेऊ देणे हे जिनिव्हा करारानुसार बंधनकारक आहे. पाकिस्ताननेही का करार स्वीकारला आहे. मात्र, जाधव यांच्या प्रकरणात पाकिस्तानने आपल्या या कर्तव्याचे पालन न केल्याने जाधव व भारत देश या दोघांचेही हक्क डावलेले गेले, असा ठपका न्यायालयाने ठेवला. पाकिस्तानने आता ‘कॉन्स्युलर अॅक्सेस’ देऊन या प्रमादाचे परिमार्जन करावे, असे न्यायालयाने सांगितले.
जाधव यांच्याविरुद्ध पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात चाललेला खटला न्यायदानाच्या प्रस्थापित आंतरराष्ट्रीय चौकटीत बसणारा नसल्याने, तो संपूर्ण खटलाच रद्द करावा आणि जाधव यांची सुटका करून त्यांना सुखरूपपणे आमच्या ताब्यात द्यावे, अशी भारताची मागणी होती. मात्र, असे करणे आपल्या अधिकार क्षेत्रात येत नाही, असा निवाडा देत, न्यायालयाने ती अमान्य केली. मात्र, ‘कॉन्स्युलर अॅक्सेस’ नाकारण्याच्या त्रुटीची पूर्तता करून पाकिस्तानने जाधव यांना दिलेल्या शिक्षेचा परिणामकारपणे फेरविचार करावा, असा आदेश न्यायालयाने दिला. हा फेरविचार कशा प्रकारे करावा, हे ठरविण्याचे स्वातंत्र्य पाकिस्तानला असेल. केलेला फेरविचार परिणामकारक आहे की नाही, हेही पाकिसानच ठरवू शकेल. त्याची न्यायालय पुन्हा शहानिशा करू शकणार नाही. हा फेरविचार व फेरनिर्णय यासाठी कोणतीही कालमर्यादाही न्यायालयाने घातली नाही.
भारताने हा अर्ज केल्यावर दोन्ही देशांचे प्राथमिक म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने गेल्या फेब्रुवारीत अंतिम निकाल होईपर्यंत त्यांच्य्या फाशीची अंमलबजावणी करण्यास अंतरिम स्थगिती दिली होती. आता तीच स्थगिती वरीलप्रमाणे फेरविचार होईपर्यंत कायम राहील.
जाधव हे भारताच्या ‘रॉ’ या गुप्तहेर संस्थेसाठी काम करणारे हेर आहेत व त्यांना बलुचिस्तानमध्ये हेरगिरी करताना पकडले गेले, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. यासाठी जाधव यांनी बनावट नावाने पासपोर्ट काढला होता, असाही आरोप होता. भारताने मात्र याचा इन्कार करून म्हटले की, जाधव यांच्याविरुद्धचा हा खटला म्हणजे पाकिस्तानने रचलेले कुभांड आहे. जाधव हे व्यापारानिमित्त पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या ईराणच्या प्रांतात गेले असता पाकिस्तानने अपहरण करून त्यांच्यावर हा खोटा खटला चालविला.
पाकिस्तानने जाधव यांना त्या देशातील भारतीय वकिलातीच्या अधिकाºयांना भेटू दिले नाही किंवा पसंतीचा वकीलही करू दिला नाही. बरीच टीका झाल्यावर आणि शिक्षा ठोठावून झाल्यावर जाधव यांच्या पत्नी व आईला, पराकोटीची बंधने घालून, जाधव यांना भेटू देण्यात आले होते.
घटनाक्रम असा...
३ मार्च २०१६ : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अटक केली.
४ मार्च २०१६ : कुलभूषण हे भारताचे गुप्तहेर असून त्यांना बलुचिस्तानमधून अटक केल्याचा पाकिस्तानचा दावा.
२६ मार्च २०१६ : इराणमध्ये कार्गोचा व्यवसाय करणाºया कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तानमधून अटक केल्याचा कोणताही सबळ पुरावा पाकिस्तानने दिला नसल्याचा भारताचा दावा.
२९ मार्च २०१६ : कुलभूषण जाधव यांचा भारताच्या इस्लामाबाद येथील राजदूतावासाशी संपर्क करून देण्यात यावा अशी भारताची मागणी.
१० एप्रिल २०१७ : पाकिस्तानमध्ये घातपाती कारवाया घडविण्याचा कट आखल्याचा व कारवाया केल्याच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना दोषी ठरवून त्यांना लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. तिची अमलबजावणी झाल्यास जाधव यांची केलेली ती पूर्वनियोजित हत्या असेल असे भारताने पाकिस्तानला बजावले.
११ एप्रिल २०१७ : जाधव यांना न्याय मिळण्यासाठी भारत कसोशीचे प्रयत्न करणार असे तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत जाहीर केले.
१४ एप्रिल २०१७ : कुलभूषण जाधव यांच्यावर ठेवलेल्या आरोपपत्राची प्रमाणित प्रत तसेच त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या लष्करी न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत भारताने पाकिस्तानकडून मागविली. जाधव व भारतीय राजदूतावासातील अधिकाºयांची भेट घडवून आणावी अशीही मागणी केली.
२० एप्रिल २०१७ : कुलभूषण यांच्यावर पाकिस्तानात चालविण्यात आलेल्या खटल्याच्या कामकाज व तसेच अपीलाची प्रक्रिया यांची सविस्तर माहिती देण्याची भारताची पाकिस्तानकडे मागणी.
२७ एप्रिल २०१७ : जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तान भेटीसाठी व्हिसा द्यावा या मागणीसाठी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे तेव्हाचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांना पत्र लिहिले.
८ मे २०१७ : कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याच्या पाकिस्तान लष्करी न्यायालयाच्या निर्णयाला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले.
९ मे २०१७ : जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती
१५ मे २०१७ : कुलभूषण यांना सुनावलेली फाशीची शिक्षा तातडीने रद्द करण्याची भारताची मागणी. त्यावरून पाकिस्तानशी भारताचे शाद्बिक युद्ध रंगले. आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितल्याचा पाकिस्तानचा आरोप.
१८ मे २०१७ : खटल्याचा निकाल देईपर्यंत जाधव यांना फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये असा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पाकिस्तानला आदेश.
२६ डिसेंबर २०१७ : कुलभूषण जाधव यांची त्यांच्या पत्नी व आईने पाकिस्तानातील तुरुंगात भेट घेतली. पाकिस्तानने अटक केल्यानंतर सुमारे एक वर्षाने कुलभूषण यांची त्यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली.
१८ एप्रिल २०१८ : आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कुलभूषण जाधव खटल्यात युक्तिवादाच्या दुसºया फेरीतील लेखी जवाब भारताने सादर केला.
१७ जुलै २०१८ : पाकिस्ताननेही युक्तिवादाच्या दुसºया फेरीतील लेखी जवाब आंतरराष्ट्रीय न्यायालयाला सादर केला. जाधव यांना फाशीची शिक्षा का सुनावली याचे स्पष्टीकरण त्यात दिले होते.
२२ आॅगस्ट २०१८ : जाधव खटल्याची सुनावणी फेब्रुवारी २०१९मध्ये होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जाहीर केले.
२१ नोव्हेंबर २०१८ : कुलभूषण जाधव यांचा भारताच्या इस्लामाबादमधील राजदूतावासाशी संपर्क प्रस्थापित करण्याची सुषमा स्वराज यांची मागणी.
१८ फेब्रुवारी २०१९ : आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव खटल्याच्या चार दिवसांच्या सुनावणीला प्रारंभ.
१९ फेब्रुवारी २०१९ : जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांची पाकिस्तानने तत्काळ मुक्तता करावी अशी भारताची न्यायालयात मागणी.
२० फेब्रुवारी २०१९ : पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाच्या कामकाजावरील आक्षेप भारताने मांडले. कुलभूषण यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे केली.
२१ फेब्रुवारी २०१९ : जाधव यांची मुक्तता करण्याची भारताची मागणी फेटाळण्याची पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाला विनंती.
४ जुलै २०१९ : कुलभूषण जाधव खटल्याचा निकाल १७ जुलै रोजी देणार असल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाहीर केले.
१७ जुलै २०१९ : कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीचा पाकिस्तानने पुनर्विचार करावा व त्यांची भारतीय राजदूतावासाच्या अधिकाºयांशी भेट घडवून आणावी असा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला. या महत्त्वाच्या खटल्यात भारताची सरशी झाली.
१५ विरुद्ध १ अशा बहुमताने भारताच्या बाजूने निकाल
पाकिस्तानविरुद्ध भारताने केलेल्या अर्जावर १६ न्यायाधीशांच्या न्यायालयाने १५ विरुद्ध १ अशा बहुमताने हा निकाल दिला. याच्याशी असहमती दर्शविणारे एकमेव न्यायाधीश साहजिकच पाकिस्तानतर्फे नेमलेले हंगामी न्यायाधीश तसद्दुक हुसैन जिलानी होते. बहुमताने निकाल देणाऱ्यांमध्ये भारतीय न्यायाधीश न्या. दलवीर भंडारी यांचाही समावेश होता. न्यायालयाचे अध्यक्ष अब्दुलकवी अहमद युसूफ यांनी आधी बहुमताचा निकाल जाहीर केला. नंतर चार न्यायाधीशांनी सहमतीची पण स्वतंत्र तर न्यायाधीश जिलानी यांनी विरोधातील निकालपत्र वाचले.
>सत्य व न्यायाचा विजय : या निकालामुळे सत्य व न्यायाचा विजय झाला आहे. आमचे सरकार प्रत्येक भारतीय नागरिकाची सुरक्षा व त्याच्या हितरक्षणासाठी नेहमीच काम करत राहील. - पंतप्रधान नरेंद्र मोदी
>साळवे यांची कृतज्ञता
भारत सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ हरीष साळवे यांनी केलेल्या प्रभावी व विद्वत्तापूर्ण युक्तिवादाचे हा निकाल भारताच्या बाजूने लागण्यात मोठे योगदान आहे. देशप्रेमापोटी साळवे यांनी केवळ एक रुपया मानधन घेऊन वकील म्हणून कामगिरी बजावली. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी साळवे यांचे आवर्जून आभार मानले. साळवे म्हणाले, हा निकाल भारताला आनंद, तर पाकला चपराक देणारा आहे.
>पाकवर ठपका
जिनिव्हा करार पाकिस्तानने स्वीकारला आहे. मात्र, जाधव यांच्या प्रकरणात पाकने या कर्तव्याचे पालन न केल्याने जाधव व भारत देश या दोघांचेही हक्क डावलेले गेले, असा ठपका कोर्टाने ठेवला.
जाधव कुटुंबीयांना मोठा दिलासा
कुलभूषण जाधव खटल्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निकाल हा भारताचा मोठा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यास परवानगी दिली व ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी भारताची बाजू उत्तमरितीने तिथे मांडली याबद्दल या दोघांनाही धन्यवाद. हा निकाल म्हणजे जाधव कुटुंबीयांना मोठा दिलासा आहे.
- सुषमा स्वराज,
माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री
>मोदींच्या राजनैतिक धोरणाचे यश
जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा पाकिस्तानने फेरविचार करावा या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजनैतिक धोरणाचाही हा विजय आहे. - राजनाथसिंह, केंद्रीय संरक्षणमंत्री
>कुलभूषण यांना भारतात
लवकर परत आणा
जाधव खटल्याचा निकाल म्हणजे भारताचा मोठा राजनैतिक विजय आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे यांचे मी अभिनंदन करतो. या सर्वांनी केलेल्या अथक मेहनतीमुळेच हे यश पाहायला मिळाले. कुलभूषण जाधव निर्दोष असून ते लवकरच भारतात परत येऊदेत हीच सदिच्छा.
-नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
>मानवी हक्कांचे
केले रक्षण
जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे त्यांना खऱ्याखुºया अर्थाने न्याय मिळाला आहे. या निकालाद्वारे मानवी हक्कांचे रक्षण करण्यात आले आहे.
- पी. चिदम्बरम, माजी केंद्रीय अर्थमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते
>स्वागतार्ह निकाल
कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचे काँग्रेस स्वागत करते. ते आता लवकरात लवकर मायदेशात परत येऊ देत हीच सदिच्छा.
- काँग्रेस पक्ष
>सत्याची बाजू राखली
कुलभूषण जाधव यांच्या खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करतो. या निकालामुळे सत्य व न्यायाचा विजय झाला आहे. जाधव यांना लवकरात लवकर भारतात परत आणा.
- अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री