कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या बुटात म्हणे ‘धातूची वस्तू’ होती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:02 AM2017-12-28T04:02:02+5:302017-12-28T04:02:14+5:30
कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी चेतनकूल सोमवारी आली तेव्हा त्या जे बूट घालून आल्या होत्या त्यात ‘धातूची संशयास्पद वस्तू’ आढळली म्हणून त्यांना ते बूट भेटीनंतर परत दिले गेले नाहीत, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे.
इस्लामाबाद: हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी चेतनकूल सोमवारी आली तेव्हा त्या जे बूट घालून आल्या होत्या त्यात ‘धातूची संशयास्पद वस्तू’ आढळली म्हणून त्यांना ते बूट भेटीनंतर परत दिले गेले नाहीत, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे.
पत्नी चेतनकूल व आई अवंती या दोघी सोमवारी इस्लामाबादमध्ये जाधव यांना भेटल्या तेव्हा त्यांना कशी अपमानास्पद वागणूक दिली गेली, याचे सविस्तर निवेदन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी जारी केले होते. त्यात भेटीनंतर जाधव यांच्या पत्नीची पादत्राणे वारंवार विनंती करूनही परत दिली गेली नाहीत, याचा उल्लेख होता. असे करण्यामागे पाकिस्तानचा काही वाईट हेतू असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही भारताने दिला होता.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांनी भारताच्या या निवेदनावर प्रतिक्रिया देताना अशी मखलासी केली की, जाधव यांची पत्नी जे बूट घालून आली होती त्यात एक संशयास्पद धातूची वस्तू आढळली. ती नेमकी काय आहे याची ‘फॉरेन्सिक तपासणी’ करण्यासाठी त्यांचे बूट ठेवून घेण्यात आले व त्यांना घालायला लगेच दुसरी पादत्राणे देण्यात आली.
जाधव यांच्या आई व पत्नीला भेटीसाठी जाताना मंगळसूत्र, बांगड्या व कपाळाची टिकलीही काढून ठेवायला सांगून पाकिस्तानने त्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक भावनांचा अनादर केला, असे भारताचे म्हहणे होते. शिवाय त्या दोघींना घालून आलेले कपडे बदलून आत जायला सांगितले, असेही भारताने म्हटले होते. कथित सुरक्षेच्या कारणास्तव असे करण्याची काय गरज होती याचा खुलासा न करता डॉ. फैजल फक्त एवढेच म्हणाले की, या दोघींना भेटीसाठी जाताना जे जे काढून ठेवायला सांगितले गेले ते सर्व त्यांना भेटीनंतर परत देण्यात आले.
काचेच्या तावदानाआडून घडविलेली भेट, त्यावेळी भारताचे उप उच्चायुक्त जे. पी. सिंग यांना आणखी एका काचेमागे उभे केले जाणे व पाकिस्तानी पत्रकारांना जाधव यांच्या आई व पत्नीच्या जवळ जाऊ दिल्याने त्यांच्याकडून या दोघींना उद्देशून आक्षेपार्ह विधाने केली जाणे, असे इतर आक्षेपही भारताने नोंदविले होते. त्या प्रत्येकाला उत्तर न देता पाकिस्तानने अशी भूमिका घेतली की, या सर्व बाबतीत त्याच वेळी हरकत घेता येऊ शकली असती. २४ तास उलटल्यानंतर या गोष्टींची वाच्यता करणे ही पश्चातबुद्धाने केलेली वायफळ बडबड आहे व त्यासंदर्भात भारताच्या तोंडाला लागण्याची आमची इच्छा नाही! (वृत्तसंस्था)
>स्वराज यांचे आज संसदेत निवेदन
सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावना विचारात घेऊन या प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज उद्या गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये निवेदन करून सरकारची भूमिका स्पष्ट करणार आहेत.