कुवैत परकीयांची संख्या कमी करणार, भारतीय कामगारांची संख्या मोठी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 06:07 AM2020-06-10T06:07:46+5:302020-06-10T06:08:16+5:30
कोरोनाचा फटका : शेख सबाह अल खालीद यांची माहिती
कुवैत सिटी : कोरोनाची जागतिक साथ आणि इंधनाच्या किमती यामुळे आखाती देशांच्या अर्थव्यवस्थांना घरघर जाणवू लागली आहे. त्यामुळेच आपल्या देशातील स्थलांतरितांची संख्या ७० टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा विचार कुवैत करीत आहे. देशाचे प्रमुख शेख सबाह अल खालीद शेख सबाह यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
आखातातील छोटा देश असलेल्या कुवैतची लोकसंख्या ४.८ दशलक्ष असून, यापैकी ३.४ दशलक्ष हे परकीय नागरिक आहेत. लोकसंख्येच्या सुमारे ७० टक्के असलेले हे स्थलांतरितांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार सध्या सुरू आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील ताण कमी होईल व देशातून बाहेर जाणाऱ्या संपत्तीला आळा बसेल, असे शेख म्हणाले. खनिजतेलाच्या घसरत्या किमतींमुळे अनेक आखाती देशांच्या अर्थव्यवस्था डगमगायला लागल्या आहेत. त्यातच आता कोरोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळेच आखाती देश स्थलांतरितांच्या प्रश्नावर विचार करू लागले आहेत. कुवैतमधील बहुसंख्य परदेशी नागरिक हे अकुशल कामगार असून, ते घरगुती कामगार आहेत. अशी हलकी कामे करण्याची कुवैती नागरिकांची तयारी नसल्यामुळे अशा कामगारांची संख्या मोठी आहे.
भारतीय कामगारांची संख्या मोठी
जगभरामधून स्थलांतरित होण्याला जर्मनी आणि सौदी अरेबिया या देशांना पसंती मिळत आहे. तसेच मागील वर्षामध्ये संयुक्त अरब अमिरातीने फ्रान्स आणि कॅनडापेक्षा अधिक परदेशी नागरिकांना आकर्षित केले आहे. सध्या कुवैतमध्ये ६.५ लाख घरगुती कामगार असून, त्यांच्यामध्ये फिलिपाइन्स, भारत, श्रीलंका आणि बांगलादेशामधील कामगार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे कुवैतने धोरणात्मक बदल केल्यास त्याचा परिणाम भारतालाही भोगावा लागण्याची शक्यता आहे.