लेडिज ओन्ली!- मंगळावर पुरुषांना ‘बंदी’!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 09:39 AM2023-01-03T09:39:04+5:302023-01-03T09:39:47+5:30

१९६९ मध्ये मानवानं पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं, त्याला आता ५३ वर्षे लोटली आहेत. त्यानंतरही काही जणांनी चंद्रावर पाऊल ठेवलं. तरीही ही यादी आतापर्यंत फक्त १२ ‘पुरुषां’पुरतीच सीमित आहे.

Ladies only!- Men are 'banned' on Mars! | लेडिज ओन्ली!- मंगळावर पुरुषांना ‘बंदी’!

लेडिज ओन्ली!- मंगळावर पुरुषांना ‘बंदी’!

Next

२१ जुलै १९६९ हा दिवस जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. सर्वच अर्थांनी मानवी इतिहासात हा दिवस मैलाचा दगड म्हणून मान्यता पावला आहे. याच दिवशी नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर आपलं पहिलं पाऊल ठेवलं आणि अख्खं जग आश्चर्यचकित झालं होतं. अंतराळातला मानवी  प्रवास आता तसा फारसा कुतूहलाच राहिलेला नाही. आजवर अनेकांनी अंतराळातला हा प्रवास केला आहे. त्यात काही सर्वसामान्य माणसांचाही समावेश आहे. आता तर मंगळावर वसाहत करण्याच्या दृष्टीने मानवाची पावलं पडू लागली आहेत. असं असलं तरीही मानवाचं शेवटचं पाऊल चंद्रावर पडण्याच्या घटनेलाही आता तशी बरीच वर्षे झाली आहेत.

१९६९ मध्ये मानवानं पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं, त्याला आता ५३ वर्षे लोटली आहेत. त्यानंतरही काही जणांनी चंद्रावर पाऊल ठेवलं. तरीही ही यादी आतापर्यंत फक्त १२ ‘पुरुषां’पुरतीच सीमित आहे. ७ ते १९ डिसेंबर १९७२ या काळात झालेली ‘अपोलो १७’ ही शेवटची मानवी चांद्रमोहीम. त्यानंतर मानवानं चंद्रावर पाऊल ठेवलेलं नाही. ‘नासा’नं आता पुन्हा ‘अर्टेमिस मिशन’ या चांद्रमाेहिमेची आखणी केली असून येत्या काही महिन्यांत मानवानं पुन्हा चंद्रावर चढाई केल्याचं दिसून येईल; पण या मोहिमेचं सर्वांत मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नासा या मोहिमेसाठी फक्त महिलांचा विचार करीत आहे. एवढंच नाही, नासानं मंगळ मोहिमेचीही तयारी सुरु केली आहे . आतापर्यंत अनेक महिला अंतराळात जाऊन आल्या आहेत; पण त्यातील एकीनंही चंद्रावर पाऊल ठेवलेलं नाही.

महिलांचं पाऊल फक्त अंतराळ स्थानकापर्यंतच मर्यादित राहिलं आहे. नासा यावेळी मात्र खऱ्या अर्थानं सीमोल्लंघन करणार आहे आणि फक्त महिलांनाच चंद्र आणि मंगळाच्या माेहिमेवर पाठवणार आहे.
- पण असं का? या मोहिमेवर फक्त महिलाच का? त्यात पुरुष का नकोत? त्याचंही एक वैशिष्ट्यपूर्ण कारण आहे. मंगळावर जाणं आणि तिथून परत येणं यासाठी सुमारे दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. मंगळ मिशनवर जर स्त्री-पुरुष दोघांनाही नेलं आणि या काळात समजा , त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि महिला अंतराळवीर गर्भवती झाली तर? नेमकं तेच नासाला नको आहे. कारण मंगळ मोहिमेवर असताना अंतराळवीरांना मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्गांच्या संपर्कात राहावं लागणार आहे. या किरणोत्सर्गांचा होणाऱ्या बाळावर काय परिणाम होईल, त्याचे दुष्परिणाम काय, हे अजून पुरेशा प्रमाणात ज्ञात नसल्यामुळे नासाला हा धोका पत्करायचा नाही. असंही आतापर्यंत झालेल्या प्रत्येक संयुक्त अंतराळ माेहिमेमध्ये सर्वच स्त्री-पुरुष अंतराळवीरांना शारीरिक जवळिकीसाठी मनाई करण्यात आली होती.

हा ‘आदेश’ सर्वांनी पाळल्याचं निदान आतापर्यंत तरी दिसतंय. सर्वच अंतराळवीरांनी आम्ही शारीरिक जवळिकीपासून कायम दूरच राहिलो, असंही सांगितलं आहे; पण पुढेही तसंच होईल, अशी खात्री नासाला आणि इतर संशोधकांना नाही. त्यामुळेच ताकही फुंकून पिण्याचा निर्णय ते घेताहेत. अर्थात संपूर्ण महिलांची टीम, याप्रमाणेच संपूर्ण पुरुषांचीच टीम हादेखील एक पर्याय नासासमोर आहे; पण महिलांच्या टीमला त्यांची पहिली पसंती आहे. कारण पुरोगामी विचारांच्या दृष्टीनं ते एक पुढचं पाऊल ठरेल आणि फक्त महिलांनाच मंगळावर घेऊन जाण्याचे फायदेही थोडे जास्त आहेत. 

ब्रिटिश अंतराळवीर हेलन शर्मन यांचं म्हणणं आहे, यासंदर्भात नासानं २०१७मध्येच तयार केलेल्या अहवालात म्हटलं आहे, मंगळ मोहिमेवर फक्त महिलांची टीम हा सध्या सर्वांत उत्तम पर्याय आहे. एकतर टीम म्हणून महिला उत्तम काम करतात, शिवाय ‘टीम लिडर’ बनण्यासाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांमधील झगडे, हेवेदावे, राजकारण या गोष्टी कमी प्रमाणात असतात. त्यामुळेच मंगळ मोहिमेसाठी नासा महिलांना प्राधान्य देणार आहे.

विवाहित जोडप्यांना नासाची ‘बंदी’! 
अंतराळ प्रवासात मानवी शारीरिक जवळिकीच्या संदर्भात नासा काटेकोर काळजी घेत असली, तरीही अंतराळात जन्माला येणाऱ्या नव्या जिवांसंदर्भात बऱ्याच काळापासून त्यांचे संशोधन सुरू आहे. नव्या जिवावर कमी गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो, त्याचप्रमाणे तेथील किरणोत्सर्गांचा गर्भावर, नव्या जिवावर काही दुष्परिणाम होतो का, हे अभ्यासण्यासाठी नासानं आजवर माकडांपासून ते मासे आणि उंदरांपर्यंत अनेक प्राण्यांना अंतराळात पाठवलं आहे, त्याचे सकारात्मक, ठोस परिणाम आणि माहिती नासाच्या हाती अजून लागलेली नाही. त्यामुळे मानवासंदर्भात ते अधिक काळजी घेत आहेत. त्यामुळे नासाने फार पूर्वीच विवाहित जोडप्यांना त्यांच्या अंतराळ प्रवासावर ‘बंदी’ घातली आहे!

Web Title: Ladies only!- Men are 'banned' on Mars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.