अमेरिकेतील लाखो विदेशी नागरिकांना बाहेरचा रस्ता?
By admin | Published: February 23, 2017 01:28 AM2017-02-23T01:28:43+5:302017-02-23T01:28:43+5:30
अमेरिकेत अस्थायी स्वरुपात राहणाऱ्या विदेशी नागरिकांवर टांगती तलवार कायम आहे. कारण, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन : अमेरिकेत अस्थायी स्वरुपात राहणाऱ्या विदेशी नागरिकांवर टांगती तलवार कायम आहे. कारण, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने मंगळवारी याबाबतचे नवे धोरण जाहीर केले आहे. देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना आता देशातून हद्दपार करण्यासाठी लक्ष्य केले जाऊ शकते. या धोरणानुसार, वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी या नागरिकांना अटकही होऊ शकते.
विदेश मंत्री जॉन केरी यांनी याबाबतच्या नव्या नियमांवर स्वाक्षरी केली आहे. देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करुन असणाऱ्या व्यक्तीने जर एखादा गुन्हा केला तर त्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. ट्रम्प प्रशासनाने आता अशा प्रवाशांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. अतिशय गंभीर गुन्हे म्हणून अशा गुन्ह्यांकडे बघितले जाणार आहे.
मेक्सिकोसाठी चिंताजनक धोरण
च्ट्रम्प यांच्या प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच एक निर्णय घेत सात मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिकांना देशात प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला खरा; पण देशातून त्याला प्रचंड विरोध झाला. तसेच न्यायालयानेही हा निर्णय हाणून पाडला.
च्दरम्यान, मेक्सिकोचे अमेरिकेतील नवे राजदूत जिरोनिमो गुटीरज् म्हणाले की, अमेरिकेच्या धोरणातील हा बदल अतिशय चिंताजनक आहे. मेक्सिकन सरकार आणि नागरिकांची काळजी वाढली आहे.
ओबामा प्रशासनाच्या मार्गदर्शक नियमानुसार, यात दोन विभाग करण्यात आले होते. विना परवाना सीमा पार करुन देशात येणे हा गुन्हा होता. तर, पासपोर्टची मुदत संपल्यावरही वास्तव्य करून राहणे हे गुन्हेगारी स्वरूपात मोडत नव्हते.
पण, ट्रम्प प्रशासन हे नियम आता कडक करत आहे. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याची गर्जना डोनाल्ड ट्रम्प यांनी फार पूर्वीच केली आहे. त्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहेत. यासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेतला जात आहे.