अंतराळातून केवळ १ तासात उतरा पृथ्वीवर! चीनकडून जगातील सर्वात शक्तिशाली विंड टनेलची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 08:23 AM2023-06-09T08:23:07+5:302023-06-09T08:24:19+5:30
विंड टनेलमुळे चीनच्या हायपरसॉनिक महत्त्वाकांक्षेचा विस्तार होणार आहे.
बीजिंग :चीनने उत्तर बीजिंगच्या हुआरो जिल्ह्यात जगातील सर्वात शक्तिशाली हायपरसॉनिक विंड टनेलची निर्मिती केली आहे. टनेल जेएफ-२२चा व्यास चार मीटर इतका आहे. ते १० किलोमीटर प्रति सेकंदापर्यंत उच्च वायूप्रवाह गती निर्माण करू शकते, जे आवाजाच्या वेगाच्या ३० पट आहे.
विंड टनेलमुळे चीनच्या हायपरसॉनिक महत्त्वाकांक्षेचा विस्तार होणार आहे. या टनेलचा वापर अंतराळ वाहतूक यंत्रणा, हायपरसॉनिक विमानांसह लष्करी संशोधनातही केला जाईल. या विंड टनेलची निर्मिती करण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी लागला असून, यामुळे अमेरिकेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
२०३५ पर्यंत हायपरसॉनिक विमानांचा ताफा तैनात करण्याचे चीन सरकारचे उद्दिष्ट आहे. हा ताफा प्रवाशांना अंतराळात घेऊन तासाभरात पृथ्वीवर पोहोचण्यास सक्षम असेल. हायपरसॉनिक उड्डाणाच्या अभ्यासात विंड टेनल आदर्श प्रयोगशाळा ठरेल,
असे संशोधकांचे मत आहे.
जगासाठी मोठा धोका
हायपरसॉनिक क्षेपणास्त्र रोखण्यासाठी जगात आजपर्यंत कोणतीही संरक्षण यंत्रणा नाही. जर चीनने विंड टनेलच्या माध्यमातून मॅक ३३चा वेग गाठला तर तो संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरू शकतो. याच्या मदतीने चिनी क्षेपणास्त्रे ताशी ४० हजार किलोमीटरचा वेग गाठू शकतात. त्यांना कोणताही देश रोखू शकत नाही. चीनकडे आधीच डीएफ-१७ नावाचे हायपरसॉनिक अँटी-शिप मिसाइल आहे.
शॉक वेव्हची घेतली मदत
- हवेचा प्रवाह निर्माण करण्यासाठी पारंपरिक विस्तार पद्धती वापरण्याऐवजी, चीनचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रोफेसर जियांग झोंगलिन यांनी नवीन शॉक वेव्ह निर्मितीचा प्रस्ताव दिला होता.
- ही प्रणाली अचूक वेळेत स्फोटांच्या मालिकेच्या उपयोग शॉक वेव्ह तयार करण्यासाठी वापरते. यामुळे विंड टनेलमधील
हवेचा प्रवास सर्वाधिक वेगवान होतो.