रशियन लष्करात नेपाळी तरुण, मोठ्या प्रमाणात भरती; युक्रेनच्या इशाऱ्यावर बंड; पुतिन झाले अधिक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 06:42 AM2023-06-28T06:42:36+5:302023-06-28T06:43:03+5:30
Russian army: रशियातील लष्करामध्ये नेपाळी तरुणांची सैनिक म्हणून भरती करण्यात आली आहे. त्यातील एका सैनिकाने सांगितले की, तो नेपाळहून रशियामध्ये उच्च शिक्षणासाठी आला होता.
मॉस्को : रशियातील लष्करामध्ये नेपाळी तरुणांची सैनिक म्हणून भरती करण्यात आली आहे. त्यातील एका सैनिकाने सांगितले की, तो नेपाळहूनरशियामध्ये उच्च शिक्षणासाठी आला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नेपाळमध्ये परत गेला असता तरी त्याला चांगली नोकरी मिळण्याची शाश्वती नव्हती. रशियामध्ये उत्तम रोजगाराच्या शोधात तो काही महिने थांबला, पण तशी संधी चालून आली नाही.
युक्रेनच्या युद्धात रशियाचे काही हजार सैनिक मरण पावले आहेत. त्यामुळे रशियाच्या लष्करात विदेशी युवकांची भरती करण्याचा पुतिन सरकारने विचार केला. त्यासाठी नियमांत बदल करण्यात आले. त्यामुळे नेपाळच्या शेकडो युवकांना रशिया लष्करात दाखल होण्याचा मार्ग खुला झाला. युक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे नागरिकत्व मिळविण्याबाबतचे नियम पुतिन सरकारने आणखी सुलभ केले आहेत.
बंड करणारे गद्दार : पुतिन
सत्तेसाठी सर्वात मोठा धोका ठरलेल्या बंडाच्या विरोधात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आक्रमक झाले असून, बंड पुकारणाऱ्यांना त्यांनी गद्दार म्हटले आहे. युक्रेन आणि इतर देशांच्या इशाऱ्यावर गद्दारांनी बंड केले, अशी टीका त्यांनी केले. भाषणादरम्यान, पुतिन अतिशय कठोर झाल्याचे आणि थकलेले दिसले.
रशियाचा नेपाळशी करार नाही
नेपाळी युवकांना रशियाच्या लष्करात सामील करून घ्यायचे असेल तर तसा दोन्ही देशांत करार होणे आवश्यक आहे. मात्र तशी पावले न टाकता रशियाने परस्पर नेपाळी युवकांना लष्करात भरती करण्यास सुरुवात केली. त्याबद्दल नेपाळच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेपाळमधील युवक नोकरीसाठी रशियामध्ये जातात. त्यामुळे त्यांना रोखणेही अशक्य आहे, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
वॅगनरचे प्रमुख प्रिगोझिन यांच्यावरील गुन्हे रद्द
-रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात बंड पुकारणारे वॅगनर या खासगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन व अन्य काही व्यक्तींवर देशविरोधी कृत्यांबाबत दाखल केलेले गुन्हे रद्दबातल करण्यात आले. पुतिन यांनी मंगळवारी ही घोषणा केली. बंडखोरांचा मुकाबला करण्यासाठी रशियाचे लष्कर व पोलिसांनी तातडीने पावले उचलली व यादवी युद्ध टाळले. त्यासाठी या यंत्रणांचे पुतिन यांनी आभार मानले आहेत.
-पुतिन म्हणाले की, वॅगनरने केलेल्या बंडाला रशियाचे लष्कर, नागरिकांनी पाठिंबा दिला नव्हता. अशा गुन्ह्यात दोषी ठरलेल्यांना २० वर्षे कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद रशियाच्या कायद्यांत आहे.
बेकारीमुळे युवक हैराण
नेपाळमध्ये बेकारीचे प्रमाण ११ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे तेथील युवक रोजगारासाठी रशियाकडे धाव घेत आहेत. पात्र उमेदवारांना रशियाने लष्कराचे दरवाजे खुले केले. त्याचा फायदा नेपाळी युवकांनी घेतला आहे.
प्रिगोझिन सध्या आहेत तरी कुठे?
अल्पकाळाचे बंड पुकारणारे येवगेनी प्रिगोझिन हे सध्या बेलारुसमध्ये असल्याचे समोर आले आहे. त्यांची बेलारुसमध्ये हकालपट्टी केली जाणार आहे, असे रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले होते.