सर्वांत मोठी रेडिओ दुर्बीण उलगडणार विश्वाचे रहस्य; १७२ अब्जांचा निर्मिती खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 08:42 AM2022-12-08T08:42:09+5:302022-12-08T08:42:21+5:30
चीनसह आठ देशांचा संयुक्त प्रकल्प
लंडन : जगातील सर्वांत मोठी रेडिओ दुर्बीण तयार करण्यात येत आहे. चीन, ब्रिटनसह आठ देशांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. त्यासाठी १७२ अब्ज रुपये खर्च होणार असून, ही दुर्बीण २०२८ मध्ये तयार होणार आहे. या प्रकल्पात भारतासह आणखी काही देश नजीकच्या काळात सहभागी होण्याची शक्यता आहे.
२१ व्या शतकातील जे महत्त्वाकांक्षी विज्ञान प्रकल्प आहेत, त्यामध्ये या दुर्बिणीचाही समावेश आहे. स्क्वेअर किलोमीटर ॲरे (एसकेए) असे नाव दिलेल्या या दुर्बिणीचे महत्त्वाचे भाग ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेत बनविण्यात येत आहेत. या प्रकल्पाचे मुख्यालय लंडन येथे आहे. या दुर्बिणीच्या निर्मितीसाठी गेल्या ३० वर्षांपासून पूर्वतयारी केली जात होती.
वेग किती?
या दुर्बिणीचे एक उपकेंद्र ऑस्ट्रेलियामध्ये कार्यरत असेल. एसकेए-लो असे त्याचे नाव असून, त्यात १,३१,०७२ अँटेना बसविले जाणार आहेत. कमी तीव्रतेचे रेडिओ संकेत गोळा करण्याचे काम एसकेए-लो करणार आहे. एसकेए रेडिओ दुर्बीण अत्यंत संवेदनशील असून, सध्या कार्यरत असलेल्या रेडिओ दुर्बिणींपेक्षा ती १३५ पट अधिक वेगाने आकाशातील घडामोडी टिपणार आहे.
भारत सहभागी होणार?
एसकेए रेडिओ दुर्बीण बनविण्याच्या प्रकल्पात सध्या चीन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड या आठ देशांचा सहभाग आहे. लवकरच भारत, कॅनडा, स्वीडन, द. कोरिया, जपान हे पाच देश या प्रकल्पात सामील होण्याची शक्यता आहे.
हायड्रोजन वायुबद्दल सखोल संशोधन
अवकाशातील ग्रह, तारे, धुमकेतू, उल्का अशा अनेक घटकांकडून येणारे रेडिओ संकेत एकत्रित करण्याचे, तसेच त्याद्वारे खगोलशास्त्रातील गूढ गोष्टींवर प्रकाश टाकण्याचे काम एसकेए दुर्बिणीद्वारे केले जाणार आहे. परग्रहांवर सजीवसृष्टी आहे का या गोष्टीचाही या दुर्बिणीद्वारे शोध घेतला जाईल. अवकाशामध्ये विविध ग्रहताऱ्यांच्या भवतालात हायड्रोजन वायूचे अस्तित्व प्राचीन काळापासून आढळून येते. तिथे या वायूची निर्मिती कशी झाली असावी, याचाही अभ्यास एसकेए दुर्बिणीद्वारे करण्यात येईल.