लास वेगास हल्ला : हल्लेखोराने आपल्या रूममध्ये लावले होते कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 04:26 AM2017-10-05T04:26:48+5:302017-10-05T04:27:08+5:30
संगीत महोत्सवाला उपस्थित असलेल्या संगीतप्रेमींवर अंदाधुंद गोळीबार करून ५९ जणांचा बळी घेणारा हल्लेखोर स्टीफन पॅडकचा पूर्वेतिहास जाणून घेण्यासह या हल्ल्याप्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत
लास वेगास : संगीत महोत्सवाला उपस्थित असलेल्या संगीतप्रेमींवर अंदाधुंद गोळीबार करून ५९ जणांचा बळी घेणारा हल्लेखोर स्टीफन पॅडकचा पूर्वेतिहास जाणून घेण्यासह या हल्ल्याप्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत. त्याने हा भयंकर हल्ला करण्याच्या काही दिवस आधी आपल्या मैत्रिणीच्या फिलिपीनमधील बँक खात्यात १ लाख डॉलर जमा केले होते. अमेरिकेला हादरून सोडणाºया या हल्ल्याचा कट त्याने अत्यंत थंड डोक्याने रचल्याचे तपासातून उघड झाले आहे.
पॅडकने हॉटेलातील आपल्या खोलीत आणि आसपास अनेक कॅमेरे लावले होते. त्यामार्फत तो हॉटेलात येणाºया-जाणाºयांसह सुरक्षा अधिकाºयांवरही पाळत ठेवून होता. मागच्या रविवारी रात्री माथेफिरू पॅडक याने हॉटेलच्या ३२व्या मजल्यावर बेभानपणे बंदुकीतून संगीत महोत्सवात धुंद असलेल्या प्रेक्षकांवर गोळ्यांचा वर्षाव केला होता. यात ५९ जण
ठार, तर पाचशेहून अधिक जखमी झाले होते.
त्याने हल्ला करण्यापूर्वी खिडक्या तोडल्या होत्या. गोळीबार अखंड गोळीबार करता यावा, यासाठी त्याने दोन खुर्च्या जोडून रॅक तयार केले होते. हल्ल्याच्या कटाबाबत पोलिसांना स्टीफन पॅडकच्या खोलीत एक टिपण आढळले आहे.
हल्ल्याआधी त्याने बंदुकाही व्यवस्थित करून ठेवल्या होत्या. त्याच्या खोलीत मोठा शस्त्रसाठाही आढळून आलेला आहे. त्याचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही. (वृत्तसंस्था)
मैत्रीण परतली; कॅसिनोमध्ये करत होती काम
मनिला : लास वेगास येथे भयंकर हल्ला करणाºया स्टीफन पॅडक याची मैत्रीण मारिलोऊ डेनली फिलिपीनहून बुधवारी अमेरिकेत पोहोचली आहे. ती मंगळवारी रात्री मनिला येथील आंतरराष्टÑीय विमानतळावरून विमानाने निघाली होती. हे विमान बुधवारी सकाळी अमेरिकेत पोहोचले. एफआयबीने डेनलीचा शोध घेण्यासाठी मदत मागितली होती. ती मागच्या महिन्यात फिलिपीनला आली होती. स्टीफनने तिच्या खात्यात एक लाख डॉलरवर जमा केले होते, असे एनबीआयचे प्रवक्ते निक सुआरेज यांनी सांगितले. ती आॅस्ट्रेलियाची नागरिक असून, कॅसिनोत काम करण्यासाठी २० वर्षांपूर्वी अमेरिकेत आली होती.