२६/११ हल्ला: कसाबसह खात्मा झालेल्या १० दहशतवाद्यांसाठी पाकमध्ये प्रार्थना करतोय हाफिज सईद
By मोरेश्वर येरम | Published: November 26, 2020 10:29 AM2020-11-26T10:29:11+5:302020-11-26T10:35:45+5:30
मुंबईवरील २६/११ हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानातील पंजाबच्या साहीवाल भागात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा राजकीय चेहरा असलेल्या जमात-उद-दवा संघटनेकडून प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली
पाकिस्तानात राजकारणाचा बुरखा परिधान केलेल्या जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेने मुंबई हल्ल्यात मारले गेलेल्या १० दहशतवाद्यांसाठी आज प्रार्थना सभेचं आयोजन केलं आहे.
मुंबईवरील २६/११ हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानातील पंजाबच्या साहीवाल भागात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा राजकीय चेहरा असलेल्या जमात-उद-दवा संघटनेकडून प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार जमात-उद-दवाचे प्राबल्य असलेल्या मशिदींमध्ये संघटनेची बैठक झाली असून २००८ च्या मुंबई हल्ल्यात तब्बल १७० जणांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या दहशतवाद्यांसाठी प्रार्थना करण्याचं निश्चित केलं गेलं आहे.
मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात एकूण ९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्याला फाशी देण्यात आली. दरम्यान, भारताने या हल्ल्यासंदर्भात सर्व पुरावे जमा करुन हाफीस सईद हाच या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचा दावा केला. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने हाफिज सईद याच्यावर १० मिलियन डॉलरचं बक्षिस घोषित केलं आहे.
हाफिज सईदने आज थेट मारले गेलेल्या दहशतवाद्यांसाठी प्रार्थना सभेचं आयोजन केल्यानं देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे.