२६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड जकी-उर-रहमान लखवीला टेरर फंडिंग प्रकरणी अटक
By कुणाल गवाणकर | Published: January 2, 2021 03:42 PM2021-01-02T15:42:36+5:302021-01-02T15:44:50+5:30
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून लखवीला अटक
इस्लामाबाद: मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या जकी-उर-रहमान लखवीला टेरर फंडिंग प्रकरणात अटक झाली आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत दिल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या पंजाबमध्ये लखवीला अटक करण्यात आली. मात्र त्याच्या अटकेचा मुंबईवरील २६/११ हल्ल्याशी कोणताही संबंध नाही.
जकी-उर-रहमान लखवीला अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाच्या प्रवक्त्यांनी दुजोरा दिला. लखवीला लाहोरमधून अटक करण्यात आली. दवाखान्याच्या नावाखाली मिळणारा निधी दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याचा आरोप लखवीवर आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं लखवीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी घोषित केलं.
26/11 Mumbai attack mastermind Zakiur Rehman Lakhvi arrested in Pakistan for terror financing, reports ARY News
— ANI (@ANI) January 2, 2021
फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या (FATF) काळ्या यादीत समावेश होऊ नये यासाठी पाकिस्तानकडून विविध क्लृप्या वापरल्या जातात. आपण दहशतवाद्यांविरोधात कारवाया करत असल्याचा देखावा पाकिस्तानकडून उभा केला जातो. याआधी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या एफआयएनं मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत मुंबईवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या ११ जणांचा समावेश केला होता.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी लष्कर-ए-तोयबानं मुंबईतील अनेक ठिकाणांवर दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यांमागे पाकिस्तानचं लष्कर आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याचे पुरावे भारताला मिळाले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दीडशेहून अधिक जण मृत्यूमुखी पडले. यामध्ये परदेशी नागरिकांचादेखील समावेश होता. जकी-उर-रहमान लखवी या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. त्याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.