हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकणाऱ्या शेवटच्या सदस्याचे निधन
By Admin | Published: July 31, 2014 03:39 AM2014-07-31T03:39:12+5:302014-07-31T03:39:12+5:30
जपानमधील हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकणाऱ्या पथकातील अखेरच्या जिवंत सदस्याचे जॉर्जियात निधन झाले. या हल्ल्याने दुसरे महायुद्ध त्वरेने संपुष्टात आणण्यासह जगाला अणुयुगात ढकलले होते.
अटलांटा : जपानमधील हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकणाऱ्या पथकातील अखेरच्या जिवंत सदस्याचे जॉर्जियात निधन झाले. या हल्ल्याने दुसरे महायुद्ध त्वरेने संपुष्टात आणण्यासह जगाला अणुयुगात ढकलले होते.
थियोदोर व्हॅन किर्क यांचे वृद्धापकाळाने ‘स्टोन माउंटन’ येथे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
व्हॅन किर्क यांनी बॉम्बहल्ल्याच्या तब्बल ६० मोहिमांत सहभाग घेतला. मात्र, प्रशांत पट्ट्यातील एका मोहिमेने त्यांच्या नावाची इतिहासात नोंद केली. ही मोहीम होती जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकण्याची. तेव्हा २४ वर्षांचे असलेले किर्क बी-२९ सुपर फोर्ट रेसमध्ये कार्यरत होते. याच तुकडीने हिरोशिमावर सहा आॅगस्ट १९४५ रोजी पहिला अणुबॉम्ब टाकला होता.
किर्क यांनी पॉल तिब्बेटस अणि टॉम फेरेबी यांच्या सोबत हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला होता. २००५ मध्ये एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत किर्क यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडल्याचे सांगितले. ते म्हणाले, किर्क यांनी बॉम्बहल्ला करणाऱ्या विमानास हिरोशिमाकडे जाण्याचा मार्ग दाखविण्याचे काम केले. अणुबॉम्ब टाकल्यानंतर आपण वाचू शकू, अशी विमानातील सर्वांना आशा तसेच धाकधूकही होती. या बॉम्बचा स्फोट होईल का, किंवा झाल्यास त्याच्या तडाख्याने विमानाचे तुकडे तुकडे होतील काय याची कोणालाच कल्पना नव्हती. या पथकाने निद्राधीन हिरोशिमा शहरावर ९ हजार पौंड वजनाचा ‘लिटल बॉय’ हा अणुबॉम्ब टाकला आणि गणती सुरू केली. एक हजार एक, एक हजार दोन असे करत त्यांनी ४३ सेकंद गणती केली. ४३ सेकंदात अणुबॉम्बचा स्फोट होईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, ४३ सेकंदानंतरही स्फोट झाला नाही. त्यामुळे किर्क यांच्यासह विमानातील सर्वांना हा बॉम्ब फुसका असल्याचे वाटू लागले होते. त्यानंतर काही क्षणात अत्यंत चमकदार प्रकाश पसरला आणि त्यानंतर धक्का जाणवला. त्यानंतर पुन्हा एक धक्का बसला. हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या स्फोटाने एक लाख ४० हजार नागरिकांचा बळी घेतला होता. हिरोशिमावरील हल्ल्यानंतर तीन दिवसांनी नागासाकी शहरात दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला. यात ८० हजार नागरिक मारले गेले. अपरिमित जीवित हानीनंतर अखेर जपानने शरणागती पत्करली होती. (वृत्तसंस्था)